नंदुरबार l प्रतिनिधी
जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील सिसा येथून बंगाल येथील बोगस डॉक्टराला अटक करण्यात आली असून त्याच्या बोगस दवाखान्यातून 25 हजार 204 रुपये किमतीचा औषधसाठा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी बोगस डॉक्टरला अटक केली आहे.
नंदुरबार जिल्ह्यात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट असून याबाबत अनेकदा प्रशासनाला विविध संघटनांनी निवेदनही दिले आहेत. मात्र आरोग्य विभागाने याकडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र दिसत आहे. धडगाव आरोग्य विभागात तालुक्यातील सिसा येथे बोगस डॉक्टर असल्याची माहिती प्राप्त झाल्याने. तालुका आरोग्य अधिकारी तसेच पोलीस दलातील पथकाने सिसा ता.धडगाव येथे 27 जून रोजी सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान तेथे दहा टाकली. त्याठिकाणी बोगस डॉक्टर रिदय देवनाथ विश्वास रा. सबदालपूर, जि. नाडिया ( पश्चिम बंगाल) हा तेथे आढळून आला त्याच्याकडे कुठलेही वैद्यकीय प्रमाणपत्र अथवा डिग्री नसताना तो अवैध पणे वैद्यकीय व्यवसाय चालवत होता. याबाबत पोलिसांनी त्याला अटक केली.
*पंचवीस हजाराची औषधी केली जप्त*
धडगाव तालुक्यातील सिसा येथे राहणाऱ्या राजा इसमा ठाकरे व दिनेश राजा वळवी यांच्या घरात रिदय देवनाथ विश्वास याने दवाखाना थाटला होता त्या ठिकाणाहून आरोग्य विभाग तसेच पोलिसांनी 25 हजार 204 रुपये किमतीचा वैद्यकीय साहित्य गोळ्या व औषधी जप्त केल्या.
*धडगाव पोलिसात गुन्हा दाखल*
पोलिसांनी बोगस डॉक्टर रिदय देवनाथ विश्वास याला अटक केली असून या प्रकरणी धडगाव तालुका आरोग्य अधिकारी कांतीलाल शिवाजी पावरा यांच्या फिर्यादीवरून धडगाव पोलीस ठाण्यात भादवी कलम 420 सह वैद्यकीय व्यवसाय अधिनियम 1961 कलम 33,33 ( ए), 35,36 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.