नंदुरबार l प्रतिनिधी
व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून जवळीक साधत ॲपद्वारे शेअर बाजारात पैसे गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवत नंदुरबारातील एका व्यापाऱ्याची ११ लाख २८ हजार ९२० रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला आहे. तर दुसऱ्या घटनेत शेअर बाजारात गुंतवणुकीसाठी व्हाट्सअप ग्रुपद्वारे आमिष दाखवून अक्कलकुवा तालुक्यातील खापर येथील हॉटेल व्यावसायिकाची ६७ लाख १ हजार रुपयांमध्ये फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. पोलिसात वेगवेगळे दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.शेअर बाजारातून पैसा कमावण्याचे आमिष दाखवत दोन दिवसात दोघा व्यापाऱ्यांची तब्बल 79 लाखात फसवणूक झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.
नंदुरबार येथील व्यापारी पवनकुमार गोपीचंद मुलचंदाणी हे शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी अभ्यास करीत होते. त्याच दरम्यान त्यांना १८ मे २०२४ रोजी जीएफएसएल सिक्युरिटी ऑफिशिअल नावाच्या व्हॉट्स ॲपग्रुपमध्ये सहभागी करून घेण्यात आले. त्यानंतर संबंधित ग्रुप ॲडमीनने शेअर्स ट्रेडिंगचे ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले. त्यानुसार त्यांनी ॲपधारकाच्या स्टेट बँक खात्यात तसेच जाना स्मॉल फायनान्स बँक लिमिटेडच्या बँक खात्यात एक लाख रुपये भरण्यास सांगितले त्यानंतर त्यांनी पैसे गुंतविले.२२ मे रोजी मूलचंदाणी यांनी कोणतेही शेअर्स खरेदी केलेले नसताना, मागणी केलेली नसताना शेअर्स खरेदी झाली.
त्यानुसार त्यांनी १३ लाख १८ हजार गुंतवणूक केली. त्यानंतर त्यांना ७६ हजार ३०० व एक लाख १२ हजार ७८० रुपये शेअर्स विक्रीपोटी परत करून मोठ्या रकमेची गुंतवणूक करावी म्हणून आकर्षित केले.याबाबत फसवणूक झाल्याचे त्याने निदर्शनात आल्याने मूलचंदाणी यांनी अडकवलेले पैसे ॲपद्वारे काढण्याचा प्रयत्न केला असता ६ जून रोजी ते ॲप बंद झाले. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याची खात्री मूलचंदाणी यांची झाली. याप्रकरणी गुरुवारी नंदुरबार उपनगर पोलिसात फिर्याद दिली.
त्यानुसार संबंधित व्हॉट्सॲप ग्रुप ॲडमीन, ॲप चालक, संबंधित बँक खातेधारक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान दुसऱ्या घटनेत अक्कलकुवा तालुक्यातील खापर येथील हॉटेल व्यावसायिक नासीर लुकमन खान (५६) यांना विनटॉन स्टॉक पुलिंग ग्रुप, केकेआरसीएस स्टॉक हे व्हॉट्सअप ग्रुप व अरिहंत कॅपिटल कस्टमर केअर क्रमांक यांनी खान यांना वेळोवेळी शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीसाठी प्रोत्साहित केले.
त्यासाठी ग्रुप ॲडमिनच्या खात्यावर पैसे पाठविण्यास सांगण्यात आले.नासीर खान यांनी जानेवारी ते जून २०२४ या सहा महिन्यात तब्बल ६७ लाख एक हजार रुपये पाठविले. सहा महिन्यात एवढी मोठी गुंतवणूक केल्यावरही फायदा न होता तोटा होत असल्याचे खान यांच्या लक्षात आले. त्यानंतर 12 जून रोजी नासिर खान यांनी अक्कलकुवा पोलिसात धाव घेतली त्यांच्या फिर्यादीवरून व्हाट्सअप ग्रुप ॲडमिन श्रीलया अकेला व अनुराग ठाकूर, अरिहंत कॅपिटल कस्टमर केअरचे रोनक बिलाला यांच्याविरुद्ध फसवणूक व माहिती तंत्रज्ञान अधिनियमाच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी पुढील तपास स्थानिक गुन्हा अन्वेशन शाखेचे निरीक्षक किरणकुमार खेडकर करीत आहेत.
अतिदुर्गम भाग असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात दोन व्यापाऱ्यांची दोन दिवसात 79 लाखात फसवणूक झाल्याचे प्रकार घडला आहे.जिल्ह्यात विविध आमिष दाखवून लुबडण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे.मात्र अनेकदा अशा घटनांची पोलिसात नोंद होताना दिसत नाही.