नंदुरबार l प्रतिनिधी
अखिल भारतीय माहेश्वरी समाजाचे आराध्य दैवत भगवान महेश यांच्या 5157 व्या महेश नवमी उत्सवानिमित्त रक्तदान शिबिरासह गोसेवा आणि विविध धार्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. रक्तदान शिबिरास महिलांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला.
सर्वप्रथम सकाळी धुळे रस्त्यावरील अहिंसा स्कूलच्या मागे असलेल्या कामधेनू गोशाळेतील गोधनास खाद्यपदार्थ देऊन गो सेवा प्रकल्प राबविण्यात आला. याप्रसंगी नंदुरबार जिल्हा माहेश्वरी युवा संघटन आणि नंदुरबार माहेश्वरी नवयुग मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. नंदुरबार येथील हाट दरवाजा परिसरातील श्री द्वारकाधीश मंदिर संस्थानच्या प्रशस्त सभागृहात भव्य रक्तदान शिबिरास प्रारंभ झाला. सकाळपासून सुरू झालेले रक्तदान शिबीर दुपारपर्यंत अखंडपणे सुरू होते. युवक वर्ग आणि पुरुषांसह महिलांनी स्वयंस्फूर्तीने उपस्थित राहून रक्तदान शिबिरास उदंड प्रतिसाद दिला. दुपारपर्यंत पंचवीस रक्तदात्यांनी आपला सहभाग नोंदविला.
महेश नवमी निमित्त आयोजित रक्तदान शिबिरात श्रीनिवास माहेश्वरी, विजय सारडा, राजेंद्र चांडक, संतोष बांगड, शामसुंदर बांगड, आशिष तोष्णीवाल, प्रशांत राठी, शैलेश मोदाणी, प्रितेश बांगड, महेंद्र झवर यांचे मार्गदर्शन आणि विशेष सहकार्य लाभले. प्रिया बिर्ला, प्रीती राठी, सरोज सारडा या महिलांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून इतर महिलांना देखील रक्तदानासाठी प्रोत्साहित केले. जनकल्याण रक्त संकलन केंद्राच्या सहकार्याने आयोजित या रक्तदान शिबिरात डॉ. अर्जुन लालचंदाणी यांच्या मार्गदर्शनाखाली आकाश जैन, संजय सूर्यवंशी, तेजस खैरनार, खलील काझी यांचे सहकार्य लाभले.