नंदुरबार l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील पाडळदा येथील धाडसी चोरी प्रकरणी पोलिसांनी दोन संशयीतांना अटक केली असून दोन फरार आहेत. एकूण पाच जणांच्या टोळीने सदर चोरी केली होती. यातील एक विधी संघर्ष बालक आहे. सुमारे आठ महिन्यानंतर या चोरीचा तपास लावण्यात पोलिसांना यश आले असून पोलिसांनी यातील 27 तोळे सोने हस्तगत केले आहे.
पाडळदा येथील वसंत लक्ष्मणदास शहा वय 82 हे आपल्या परिवारासह ऑक्टोबर 2023 मध्ये खारघर, मुंबई येथील त्यांच्या मुलाकडे गेले असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचा कडी कोंडा तोडून घरात प्रवेश करीत घरातील कपाट व लॉकर तोडून त्यातील सोन्या चांदीचा ऐवज लंपास केला होता. डिसेंबरला शहा यांचा पुतण्या प्रतीक याला घराचा दरवाजा उघडा दिसल्यानंतर त्याने शहा यांना याबाबतची माहिती दिल्यानंतर शहा हे आपल्या कुटुंबासह 30 डिसेंबरला रात्री दहा वाजता पाडळदा येथे परतले.
त्यांनी घराची पाहणी केली असता सामान सर्वत्र विखुरलेले होते व बेडरूम मधील कपाट व त्याचे लॉकर तोडून अज्ञात चोरट्यांनी 43 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने आणि दीड किलो चांदी असा सुमारे 18 लाख 61 हजार 600 रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला होता. याबाबत शहा यांच्या फिर्यादीवरून शहादा पोलिसात 31 डिसेंबरला अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला होता.
सदर धाडसी चोरी पोलिसांसमोर आव्हान ठरली होती. यातील चोरट्यांना जेरबंद करण्यासाठी पोलिसांनी विशेष पथकांची निर्मिती केली मात्र, त्यांना अपेक्षित यश मिळत नव्हते. पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांनी सदर चोरीचा तपास सुरूच ठेवला होता. माहितीगारां मार्फत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी या संपूर्ण चोरीचा छडा लावला.
याप्रकरणी शहादा पोलिसात पाच जणांवर पुन्हा नोंदविण्यात आला असून पवन ऊर्फ शरद अरुण चव्हाण (गोंधळी), रा. एकता नगर, नंदुरबार ता. जि. नंदुरबार (सध्या तळोदा पोलीस स्टेशनला अटकेत आहे),
राहुलसिंग मोतीसिंग भाटीया, वय 25 वर्षे, रा. ओसवाडा, ता. पानसेमल, जि.बडवाणी, मध्य प्रदेश यांना अटक करण्यात आली आहे. तर शेरुसींग त्रिलोकसींग शिकलीकर, राजेंद्रसींग प्रितमसींग शिकलकर, रा.उमर्टी जि. बडवाणी मध्यप्रदेश हे दोन्ही संशयित आरोपी फरार आहेत तर एक 17 वर्षीय विधी संघर्ष बालकाचा या टोळीत समावेश आहे.
सदर चोरीतील सोने संशयितानी चोपडा येथील एका सराफाला विक्री केल्याची कबुली दिली असून आतापर्यंत दहा व 17 तोळे वजनाचे अशा सुमारे दोन सुमारे 27 तोळे सोन्याची लगड पोलिसांनी जप्त केली आहे. उर्वरित ऐवज शोधण्यासाठी पोलिसांनी विशेष पथकांची निर्मिती केली असून या गुन्ह्याची व्याप्ती मध्य प्रदेश राज्यात असल्याने तेथेही तपास केला जात आहे अशी माहिती पोलिसांनी दिली. सदर गुन्ह्याचा तपास उपनिरीक्षक अभिजीत अहिरे करीत आहेत.
सदर गुन्ह्यातील आरोपींना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक किरण खेडकर व त्यांच्या पथकाने जेरबंद केले. तर चोरीला गेलेला मुद्देमाल पैकी सुमारे 27 तोळे सोने पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत व त्यांच्या सहकाऱ्यांनी चोपडा येथील नवीन टाटिया या सराफा कडून जप्त केले आहे. उर्वरित सोने लवकरच हस्तगत करण्यात येऊन या टोळीकडून जिल्ह्यातील अनेक चोरीच्या घटना उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.