नंदुरबार l प्रतिनिधी
मुंबई येथील ‘ओम’-द ग्लोबल आर्ट सेंटर येथे दि.२६ ते २८ मे २०२४ या काळात ‘शिल्परंग-८’ या राष्ट्रीय पातळीवरील निवासी कला शिबिराचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये देशातील विविध राज्यातुन १२ शिल्पकार व चित्रकारांनी सहभाग घेतला आहे. या कला शिबिराचे उदघाटन महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते आणि खासदार डॉ. हिनाताई गावित व नंदुरबार जिल्हा परिषद अध्यक्षा डॉक्टर सुप्रिया गावित यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.
या प्रसंगी बोलताना मंत्री डॉ. विजयकुमार गावित म्हणाले, “चित्रकार डॉ. नरेंद्र बोरलेपवार यांच्या संकल्पनेतुन आकाराला येत असलेले ओम द ग्लोबल आर्ट सेंटर हे प्रत्तेक भारतीय व्यक्तिला अभिमान वाटावा असे कला केंद्र तयार होत आहे. भारतीय कला, संस्कृती व पर्यावरण या तिन विषयांना समर्पित असणारे ‘ओम’ येणाऱ्या काळात केवळ महाराष्ट्राचे नव्हे तर संपूर्ण देशाचे नाव आंतरराष्ट्रीय कला पटलावर ठळकपणे कोरण्याचे काम करणार आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भारताला जागतिक महासत्ता बनवण्याचे स्वप्न आहे, त्या स्वप्नपूर्तिकरीता अत्यंत मौलिक असे कलात्मक योगदान देण्याचे मोठे कार्य डॉ. नरेंद्र बोरले पवार करत आहेत. त्यांच्या या सांस्कृतीक समाजकार्यास शक्यअसेल ते सर्वतोपरी सहकार्य राज्य शासनाकडून मिळवून देण्यास मी मदत करेल.”
डॉ. हिना गावित यांनी सदर प्रकल्पाची मुक्त कंठाने प्रशंसा तर केलीच पण केंद्र शासनाच्या वतीने जी काही मदत करता येईल ती करण्याचे आश्वासन दिले. तसेच डॉ. सुप्रिया गावित यांनी ओम द ग्लोबल आर्ट सेंटर हे आज जरी एक लहान रोपटे दिसत असले तरी फार लवकर देशाच्या सांस्कृतिक पटलावर याचा एक मोठा वटवृक्ष झालेला दिसेल असा विश्र्वास व्यक्त केला. कार्यक्रमनंतर संपूर्ण गावित परिवाराच्या हातुन एक चाफ्याचे झाड ओम च्या परिसरात लावून वृक्षारोपणाचे पवित्र कार्य देखील करण्यात आले. “गावित परिवाराने दिलेली कौतूकाची थाप… माझ्या जगण्याला बळ देते…!” अशा शब्दात या प्रसंगी निवासी चित्रकला व शिल्पकला कार्यशाळेचे आयोजक डॉ. नरेंद्र बोरलेपवार यांनी भावना व्यक्त केल्या.
या प्रसंगी नंदुरबार जिल्हापरिषदेच्या माजी अध्यक्षा डॉ. कुमुदिनीताई गावित, राजश्री वळवी, विष्णु पाटील, सुनिल लोकारे, यांच्यासह सर्व सहभागी शिल्पकार आणि चित्रकार रतन साहा, स्वप्नील सांगोळे, सचिन चौधरी, डॉ नरेंद्र बोरलेपवार, संदेश खुळे, महेश जगताप, सुरेंद्र चावरे, निवास काणेरे, सतीश काळे, प्रांजली बोरलेपवार, संदीप मोरे, नवनाथ क्षीरसागर हे उपस्थित होते. सदर निवासी चित्रकला व शिल्पकला कार्यशाळेचे क्युरेशन डॉ. नरेंद्र बोरलेपवार व प्रांजली बोरलेपवार यांनी केलेले होते तर आयोजनात दिपक जोगदंड, रेश्मा शेख व प्रविण कुंभार यांचे मोलाचे सहकार्य लाभले होते.








