नंदुरबार l प्रतिनिधी
बालनाट्य प्रशिक्षण शिबिरात मुलांना संस्कार शिकवले जातात. त्यांना आकार देण्याचे काम केले जाते व त्यातुनच भविष्यातील कलावंत घडत असतात, असे मत बालनाट्य प्रशिक्षण शिबिराचे प्रशिक्षक हनुमान सुरवसे यांनी व्यक्त केले. बालरंगभूमी परिषद नंदुरबार जिल्हा शाखा व गाडगेबाबा शैक्षणिक व सांस्कृतिक सेवा मंडळ शिंदे आयोजित अभिनयाची पाठशाळा अंतर्गत हसत-खेळत बालनाट्य प्रशिक्षण शिबिराचा समारोप येथील डी.आर.हायस्कूलच्या प्रांगणात ‘वासुदेव आम्हाला हवाय..!!’ या बालनाट्य सादरीकरणाने करण्यात आला.
यावेळी जेष्ठ साहित्यिक प्रभाकर भावसार, डी.आर.हायस्कूलचे मुख्याध्यापक तथा बालरंगभूमी परिषद नंदुरबार जिल्हा शाखेचे कार्याध्यक्ष पंकज पाठक, जय हिंदळा माता ट्रायबल एज्युकेशन संस्थेचे सचिव गिरीष पत्रकार धनराज माळी, बालरंगभूमी परिषद नंदुरबार जिल्हा शाखेचे अध्यक्ष राजेश जाधव आदी उपस्थित होते.
दि.०२ मे पासून नंदुरबार येथील कमला नेहरू कॅम्पस येथे सुरु झालेल्या या बालनाट्य प्रशिक्षण शिबिरात ३५ बाल कलावंतांनी सहभाग घेतला होता. या सात दिवशीय बालनाट्य प्रशिक्षणात योगा, संगीत, संभाषण कौशल्य, भाषा आणि वाचा शुद्धी, अभिनय आणि रंगमंच तंत्र, आत्मविश्वास तसेच विविध नाट्य खेळ घेण्यात आले. या बालनाट्य प्रशिक्षण शिबिरातील सहभागी ३५ बाल कलावंतांनी ‘वासुदेव आम्हाला हवाय..!!’ या बालनाट्याचे सादरीकरण केले. या बालनाट्यात बाल कलावंतांनी उत्स्फूर्त अभिनय करून उपस्थित प्रेक्षकांची दाद मिळवली. या वेळी बाल कलावंतांनी देखील प्रशिक्षणबाबत आपले मनोगत व्यक्त केले. या प्रशिक्षणादरम्यान विविध चर्चासत्र घेणारे एस.एन.पाटील, डॉ.मनीषा वळवी, हेमंत पाटील, क्षमा वासे-वसईकर यांचा देखील सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते बाल कलावंतांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. बालनाट्याची सुरुवात मंगलाचरण या गीताने करण्यात आली. बालरंगभूमी परिषद मध्यवर्ती शाखा मुंबईचे कार्यकारी सदस्य नागसेन पेंढारकर यांनी सभासद योजनेची माहिती देऊन नंदुरबार जिल्ह्यातील विद्यालयातील या योजनेत सहभागी करण्यात येईल असे सांगितले.
या योजनेतून सुजाण व रसिक प्रेक्षक निर्माण करण्याची प्रक्रिया असेल असे देखील सांगण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तुषार ठाकरे यांनी तर आभार राजेश जाधव यांनी मानले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी उपाध्यक्ष मनोज सोनार, सहकार्यवाह राहुल खेडकर, पार्थ जाधव, चिदानंद तांबोळी, जितेंद्र खवळे, कुणाल वसईकर, तुषार सांगोरे, हरीश हराळे, धर्मेंद्र भारती, रोहित हराळे, आशिष खैरनार, ममता जाधव, संगिता पेंढारकर आदींनी परिश्रम घेतले.