नंदुरबार l प्रतिनिधी
गेल्या अनेक वर्षांपासून राज्य शासनातर्फे मंत्रालयात आणि केंद्र शासनातर्फे संसद भवनात लिंगायत धर्माचे संस्थापक क्रांतीसुर्य, समता नायक, जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांची जयंती तिथीनुसार अक्षय तृतीयेला साजरी करण्यात येते.
त्यानुसार नंदुरबार जिल्ह्यातील सर्वच शासकीय, निमशासकीय कार्यालय आणि सेवाभावी संस्थातर्फे थोर समाज सुधारक, महात्मा बसवेश्वर महाराज यांची जयंती अक्षय तृतीयेला प्रतिमा पूजनासह विविध सामाजिक उपक्रमांनी साजरी करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र बसव परिषदेचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष महादू विठ्ठल हिरणवाळे यांनी जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
निवेदनाचा आशय याप्रमाणे, प्रति वर्षाप्रमाणे यंदाही शुक्रवार दि. 10 मे रोजी अक्षय तृतीयेला लिंगायत धर्माचे संस्थापक, जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांची जयंती राज्यासह देशात साजरी होणार आहे. त्यानुसार नंदुरबार जिल्ह्यातील सर्व शासकीय आणि निम शासकीय कार्यालयांमध्ये शासन आदेशानुसार महात्मा बसवेश्वर महाराज यांची जयंती साजरी करण्यात येते. यापूर्वी जिल्हा प्रशासनास सन 2009 मध्ये मागणी पत्र देण्यात आले होते.
त्यानुसार तत्कालीन जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी नंदुरबार जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयांना पत्राद्वारे आदेशित करून महात्मा बसवेश्वर महाराज जयंती साजरी करण्याचे आदेश दिले होते.
मात्र नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालय वगळता जिल्ह्यातील कुठल्याही शासकीय, निमशासकीय कार्यालयात किंवा पोलीस ठाण्यात महात्मा बसवेश्वर महाराज जयंती निमित्त प्रतिमा पूजन होत नसल्याचे दिसून येते. मंत्रालयासह राज्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयांमध्ये जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जयंती निमित्त प्रतिमा पूजन करण्याचे अध्यादेश यापूर्वीच सर्वत्र पारित करण्यात आले आहेत.
त्यानुसार विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी कार्यालय यांनी त्यांच्या विभागातील सर्वच कार्यालयांमध्ये महात्मा बसेश्वर महाराज जयंती निमित्त कार्यक्रम आयोजन करण्याबाबत आवश्यक त्या सूचना देऊन अंमलबजावणी करण्याबाबत योग्य त्या कार्यवाही संदर्भात अध्यादेशाद्वारे शासनातर्फे परिपत्रक काढण्यात आले आहे.
लिंगायत धर्माचे संस्थापक क्रांतीसुर्य, जगतज्योती, समतानायक, महात्मा बसवेश्वर महाराजांच्या जयंती निमित्त नंदुरबार जिल्ह्यातील
सर्व शासकीय व निम शासकीय कार्यालयात अक्षय तृतीयेला तिथीनुसार महात्मा बसवेश्वर महाराज जयंती निमित्त प्रतिमा पूजन करण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र बसव परिषदेचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष महादू विठ्ठल हिरणवाळे यांनी केली आहे.