नंदुरबार l प्रतिनिधी-
देशाला सगळ्या स्तरावर मजबूत करण्याबरोबरच दलित, आदिवासी आणि इतर वंचित घटकांना समृद्धीच्या मार्गावर आणण्याचे काम खऱ्या अर्थाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. म्हणून त्यांचे हात बळकट करण्यासाठी महायुतीच्या उमेदवार डॉक्टर हिना गावित यांना जिंकवून आणायचे आहे. त्यासाठी संघटित प्रयत्न करणारे सर्व पन्ना प्रमुख, बुथ प्रमुख आणि गाव पातळीवरचे कार्यकर्तेच आपली खरी शक्ती असून आपण सारे असेच संघटित काम करूया, असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे नेते तथा आदिवासी विकास मंत्री नामदार डॉ. विजयकुमार गावित यांनी नंदुरबार येथे पार पडलेल्या बैठकीत केले.
नंदुरबार शहरातील निलेश लॉन्स येथे ही बैठक संपन्न झाली. नंदुरबार तालुक्यातील विविध गावातून पन्ना प्रमुख बूथ प्रमुख यांच्याप्रमाणे गाव पातळीवरील कार्यकर्ते सरपंच उपसरपंच सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष डॉ.सुप्रिया गावित, भाजपाचे तालुकाप्रमुख जे. एन.पाटील, जिल्हा परिषद सदस्य शांताराम पाटील, शनिमंडळ येथील मुन्ना पाटील यांच्यासह धानोरा सुंदरदे, नटावद, आष्टे, रनाळे शनिमांडळ कोपर्ली खोकराळे अन्य गावातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
आपण लोकांच्या हिताची आणि गावाच्या विकासाची भरपूर कामे केली असल्यामुळे मतदारांमध्ये जाऊन सांगण्यासारखे आपल्याकडे खूप काही आहे परंतु आपल्या विरोधकांकडे असे काहीही नाही आणि त्यामुळेच लोकांना भ्रमित करणाऱ्या गोष्टींचा त्यांना आधार घ्यावा लागतो, असे सांगतानाच नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित यांनी महायुतीच्या उमेदवार डॉक्टर हिना विजयकुमार गावित यांनी मागील दहा वर्षात केलेल्या विकासकामांविषयी माहिती दिली. गावागावात प्रचार करताना या कामांची माहिती मतदारांना द्यावी आणि त्या आधारावर प्रचार करून बहुमताने विजयी करावे असेही आवाहन केले.