नंदूरबार l प्रतिनिधि
महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील विविध विभागांत उल्लेखनीय आणि गुणवत्तापूर्ण सेवा देणाऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दरवर्षी 1 मे महाराष्ट्र दिनी पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह, बोध चिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्याची परंपरा महाराष्ट्र पोलीस दलात आहे.
2023 मध्ये गुणवत्तापूर्ण सेवा, दरोडेखोर, गुन्हेगारांच्या टोळ्यांविरुध्द् केलेल्या कारवाया, नैसर्गिक आपत्तीच्या वेळी केलेली उत्कृष्ट कामगिरी, नक्षलवाद्यांविरोधात केलेल्या कारवाईत उल्लेखनीय कामगिरी, पोलीस सेवेत 15 वर्षे उत्तम सेवाभिलेख, क्लिष्ट आणि बहुचर्चित थरारक गुन्ह्यांची उकल करुन खटले कोर्टात दाखल करणे, विशेष शाखेत उत्तम कामगिरी, राष्ट्रीय स्तरावरील खेळात प्राविण्य दाखविणे, प्रशंसनीय स्वरुपाची इतर कामगिरी व उत्युत्तम काम केल्याबद्दल जनतेच्या समस्या सोडवून पोलिसांची प्रतिमा उंचावणे, 20 वर्षे विना अपघात उत्तम सेवाभिलेख अशा विविध विभागात केलेल्या कामगिरीबद्दल पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह प्रदान करण्यात येत असते.
नंदुरबार जिल्हा पोलीस दलाने दरवर्षीची परंपरा राखत यंदाही 6 पदक मिळवुन नंदुरबार जिल्हा पोलीस दलाचे नांव उंचावले आहे. यामध्ये नंदुरबार जिल्ह्यातील पदकप्राप्त पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना क्लिष्ट गुन्हयांचा तपास, सेवेत सतत 15 वर्षे उत्तम सेवाभिलेख राखणे, खेळ स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावर प्राविण्य मिळविणे अशा उत्कृष्ट कामगिरीसाठी यंदाचे पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह/बोधचिन्ह देण्यात आलेले आहे,
यात पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा नंदुरबार, पो. हवा नरेश ओंकार गुरव नेमणुक नंदुरबार तालुका पोलीस ठाणे, पो. हवा भिमसिंग सत्तार ठाकरे नेमणुक म्हसावद पोलीस ठाणे, पो. नाईक मोहन पांडुरंग ढमढेरे नेमणुक- स्थानिक गुन्हे शाखा नंदुरबार, पो. नाईक संदिप संतोष लांडगे नेमणुक शहादा पोलीस ठाणे, महिला पोशि निंबाबाई रामा वाघमोडे अशा 6 पोलीस अधिकरी व अंमलदारांना पदक मिळालेले आहे. तसेच जिल्हा कारागृह अधिक्षक राजू रामचंद्र देशमुख यांना देखील विशेष कामगिरी बद्दल यावेळी पोलीस अधीक्षक यांचे हस्ते पदक प्रदान करण्यात आले.
1 में महाराष्ट्र दिनी पोलीस अधीक्षक कार्यालय आवारात पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह जाहिरझालेल्या अधिकारी व अंमलदार यांना पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांचे हस्ते पदक प्रदान करण्यात आले. त्यावेळी नंदुरबार पोलीसांकडून भविष्यात देखील अशीच उत्तम कामगिरी होईल अशी अपेक्षा व्यक्त करुन पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी सर्व पदक प्राप्त अधिकारी व अंमलदारांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.