नंदुरबार l प्रतिनिधी
मतदारांनी वारंवार संधी देऊन सुद्धा ज्यांना कधी विकास करता आला नाही, ते काँग्रेस नेते खोटं बोलून लोकांची दिशाभूल करीत आहे आणि आता आरक्षण संविधान आणि त्यासारखे मुद्दे घेऊन पुन्हा मतं मागायला येत आहेत.
खोटारडेपणा करून दिशाभूल करणाऱ्या अशा नेत्यांना जागा दाखवा; अशा घनाघाती शब्दात महायुतीचे उमेदवार डॉ. हिनाताई गावित आणि शिंदे गटाच्या आ.मंजुळाताई गावित यांनी हल्लाबोल केला.
लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या तथा भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार खा. डॉ. हिनाताई गावित यांनी 30 एप्रिल 2024 रोजी साक्री तालुक्यातील दहिवेल आणि चौपाळे जिल्हा परिषद गटातील लहान मोठ्या सर्व गावातून प्रचार फेरी काढून मतदारांशी संपर्क केला.
भर उन्हात गाव अन गाव पिंजून काढले. कोंडाईबारी, बर्डीपाडा, डुक्करीपाडा, तोरणकुडी, धनेर, उंबरखडवा, जांभाळी, आमळी, चौपाळे, हनुमंतपाडा, राईनपाडा,गरताड ,रोहोड, जामखेल, सुतारे, कुरुसवाडे, मचमाळ, शिरसोले, सातरपाडा, दहिवेल इत्यादी गावांमधून ही प्रचार फेरी काढण्यात आली.
उमेदवार डॉ.हिनाताई गावित यांच्या समवेत शिंदे गटाच्या शिवसेनेच्या आमदार मंजुळा गावित यांनी या प्रचार फेरीचे नेतृत्व केले. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य खंडू आप्पा कुवर, जिल्हा परिषद सदस्य सुनेत्रा साहेबराव गांगुर्डे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश सोनवणे, शिवसेना जिल्हाध्यक्ष तुळशीराम गावित, भाजप जिल्हा उपाध्यक्ष चंद्रजीत सुरेश पाटील, आदिवासी सेवक पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ कार्यकर्ते वसंत घरटे, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा चे अध्यक्ष विकी कोकणी, विधानसभा निवडणूक प्रमुख मोहन सूर्यवंशी, सचिन देसले, संजय अहिरराव, तुषार घरटे यांच्यासह त्या भागातील विविध गावाचे सरपंच उपसरपंच कार्यकर्ते आणि महायुतीच्या घटक पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रचार फेरी दरम्यान महायुतीच्या उमेदवार डॉ. हिनाताई गावित यांचे प्रत्येक गावात जल्लोषात स्वागत करण्यात आले. जागोजागी महिलांनी औक्षण करून आशीर्वाद व शुभेच्छा दिल्या. काही वसाहतींमध्ये थांबून डॉ. हिनाताई गावित यांनी मतदारांशी विशेषतः महिलांशी संवाद केला त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. काही गावांमध्ये कॉर्नर सभा देखील घेण्यात आल्या. रोहोड गावी झालेल्या सभेत बोलताना त्यांनी सांगितले की, कॉर्नर सभा मधून आतापर्यंत साक्री तालुक्यातील 3 हजार हून अधिक बेघरांना घरकुल मिळवून दिले. जवळपास 50 हजार गृहिणींना मोफत गॅस मिळवून दिले. साक्री तालुक्यातील 10 उपकेंद्रांच्या इमारत बांधण्यासाठी कोट्यवधीचा निधी मिळवून दिला. साक्री तालुक्यात लहान लहान गावांना पंधरा लाख-वीस लाख याप्रमाणे नुसत्या कॉंक्रिटीकरणाच्या कामाला कोटी रुपयांचा निधी दिला. 25 गावांना सव्वाचार कोटीहून अधिक रुपयांचा निधी देऊन सभा मंडप उभारले. ग्रामसडक योजनेतील रस्त्यांसाठी 2739 लक्ष रुपये तसेच साक्री तालुक्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर करून दिला. यासह साक्री तालुक्याच्या विकासासाठी काय केले, याची उजळणी करण्यात आली.