नंदुरबार l प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अक्कलकुवा तालुक्यातील व्यापारी बांधवांची चर्चा करण्यासाठी चाय पे चर्चा आयोजित करण्यात आली. त्या चर्चेत महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री नामदार डॉ. विजयकुमार गावित यांच्या समवेत उपस्थित मान्यवरांनी दिलखुलास चर्चा केली.
मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या समवेत एकनाथराव शिंदे गटाच्या शिवसेनेचे विधान परिषद सदस्य आमशा पाडवी, भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष नागेश पाडवी, यशवंत नाईक आणि स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.
स्थानिक व्यापारी बांधव आणि मान्यवरांनी उत्स्फूर्तपणे या चाय पे चर्चा मध्ये सहभाग घेतला. व्यापार व्यवसाय औद्योगिक यासह रस्ते विकास आणि अन्य बाबतीत लोकांमधून व्यक्त होणाऱ्या अपेक्षा, करावयाचे विकास काम आणि मागील दहा वर्षात खासदारकीच्या माध्यमातून डॉक्टर हिना गावित यांनी दुर्गम भागासह अक्कलकुवा तालुक्याचा केलेला विकास यावर दिलखुलास चर्चा केली. भारतीय जनता पार्टीचे सरकार राज्यात आणि केंद्रात आल्यापासून आदिवासी समूहांच्या प्रगतीसाठी कसे प्रयत्न झाले आणि अक्कलकुव्याला त्याचा काय लाभ झाला यावर मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांनी उद्बोधक माहिती दिली.








