नंदुरबार l प्रतिनिधी
शहादा येथील पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाच्या विद्यार्थी विकास विभाग व राष्ट्रीय सेवा योजना एकक यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी “मतदान जनजागृती” या विषयावर शहादा शहरात विविध ठिकाणी पथनाट्य सादर करून रॅलीच्या माध्यमातून जनजागृती करीत मतदान विषयी एक प्रेरक संदेश देण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मयूरभाई पाटील, प्रमुख पाहुणे ॲड.राजेश कुळकर्णी, ॲड.जगदीश कुवर, प्राचार्य डॉ.एस.पी. पवार व पत्रकार बांधव उपस्थित होते. सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दोंडाईचा रस्त्यावरील सप्तशृंगी मंदिर चौकात माँ सरस्वती, स्व.अण्णासाहेब पी.के. पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप्रज्वलन करून पथनाट्य सादर करण्यात आले त्यानंतर मयूरभाई पाटील यांच्या हस्ते रॅलीला हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ केला. शहरातील सप्तशृंगी मंदिर चौक, स्टेट बँक चौक, नगर पालिकाजवळील जनता चौकात विद्यार्थ्यांनी पथनाट्यातून मतदान विषयी जनजागृती केली.
सध्या देशात लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक होत असून त्यात मतदानाची टक्केवारी वाढावी व लोकशाही अधिक बळकट व्हावी त्या दृष्टीने सर्वांनी मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. मतदान राष्ट्र विकास आणि प्रगतीचा दिशा देणारा अधिकार आहे. मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य असून, आपल्या मतदानाचा हक्क बजावताना तो आपण विचारपूर्वक निर्णय घेऊन करायला पाहिजे. मतदान करणे हे प्रत्येक व्यक्तीचे हक्क आणि कर्तव्य आहे व त्यासोबत राष्ट्रउभारणीचे ही काम आहे.
मतदान करणे हे आवश्यक असून प्रत्येक नागरिकाने मतदान केलेच पाहिजे आणि आपला हक्क बजावला पाहिजे. लोकशाहीत निवडणुकांना महत्व आहे आणि निवडणुकीत मुख्य घटक हा मतदार आहे. नवयुवकांनी जास्तीतजास्त संख्येने मतदान केले पाहिजे व त्याबाबतीत जनजागृती करावी. नागरिकांनी मतदानात उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन लोकशाही अधिक बळकट करावी.
युवक व नागरिकांनी राष्ट्रसेवेच्या भावनेने मतदान करावे. रॅलीत लोकांमध्ये मतदानाविषयी जनजागृती निर्माण व्हावी ह्यादृष्टीने मतदान विषयी घोषणा देऊन व पाट्या लावून “मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो” मतदान करा असे फलक हातात घेऊन जनजागृती करण्यात आली. पथनाटयाचा शेवटी सर्वांनी मतदार प्रतिज्ञा घेतली व त्यात सर्वानी मतदान करू असा निश्चय करीत एक प्रेरक संदेश विद्यार्थ्यांकडून पथनाट्याचा माध्यमातून देण्यात आला. समारोप प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.
सदर पथनाट्यसाठी पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष दीपकभाई पाटील, उपाध्यक्ष जगदीशभाई पाटील, सचिव श्रीमती कमलताई पाटील, शैक्षणिक व सामान्य प्रशासन विभागाचे समन्वयक मकरंदभाई पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मयूरभाई पाटील, प्राचार्य डॉ.एस.पी. पवार यांचे मार्गदर्शन लाभले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा. हितेंद्र चौधरी यांनी केले. सदर कार्यक्रमात मोठ्या संख्यने विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.अमृता पाटील, तसेच महाविद्यालयाचे प्राध्यापक व कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले.