नंदुरबार l प्रतिनिधी
अनंत श्रीविभूषित महामंडलेश्वर स्वामी करुणानंदगिरीजी महाराज यांचे शुक्रवार दि. 12 एप्रिल रोजी नंदनगरीत प्रथमच आगमन होत आहे. पुढील वर्षी अर्थात सन 2025 मध्ये उत्तर प्रदेशातील अलाहाबाद येथे महाकुंभ मेळावा होणार आहे.
या मेळाव्याचे निमंत्रण सुंदरकांड परिवार आणि नंदुरबार वासियांना देण्यासाठी स्वामी करुणानंदगिरी महाराज नंदुरबारात येत आहेत.
मध्यप्रदेश राज्यातील करेरा शिवपुरी येथील अमृतेश्वर महादेव श्री सिद्धी खंडेश्वरी मंदिरचे अध्यक्ष स्वामी करुणानंदगिरी महाराज यांच्या उपस्थितीत नंदुरबार येथे सुंदरकांड आणि धानोरा येथे भक्त मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
परम पूज्य संत श्री गुलाब बाबा यांचे अनुयायी असलेले अनंत श्रीविभूषित महामंडलेश्वर स्वामी करुणानंद गिरीजी महाराज यांचा भक्त परिवार नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर आहे. त्यानुसार शुक्रवार दि. 12 एप्रिल रोजी सायंकाळी मध्य प्रदेश राज्यातून स्वामी करुणानंद गिरी महाराज नंदनगरीत दाखल होणार आहेत.
सर्वप्रथम सायंकाळी दीनदयाल चौकातील कमलाकर बागुल यांच्याकडे आगमन व राखीव. शनिवार दि.13 एप्रिल रोजी सायंकाळी सात ते दहा पर्यंत शहरातील नळवा रस्त्यावरील परशुराम चौकात श्री रामदूत सुंदरकांड मंडळातर्फे भव्य संगीतमय सुंदरकांड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
तसेच रविवार दि. 14 एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता धानोरा येथे भव्य भक्त मेळावाहोईल. यावेळी स्वामी करुणानंदगिरी महाराज उपस्थित भक्तांना अध्यात्मिक मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतर सोमवार दि. 15 एप्रिल रोजी सकाळी मध्यप्रदेशकडे रवाना होणार आहेत. नंदुरबार येथील श्री रामदूत सुंदरकांड मंडळातर्फे आयोजित सुंदरकांड तसेच धानोरा येथील भक्त मेळाव्यास भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.