नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार शहरातील धुळे चौफुली येथे क्लासेसला जाणाऱ्या इयत्ता नववीची विद्यार्थीनी डिंपल सतिष पाटील (वय १६) ही सायकलीने जात असताना भरधाव वेगाने जाणाऱ्या डंपरने धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना घडली. अपघात घडल्यानंतर चालक स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर झाला असून त्याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की,नंदुरबार तालुक्यातील निंभेल येथील सतिष पाटील मुलांच्या शिक्षणासाठी ते नंदुरबारमधील नेहापार्कमध्ये राहत होते.भाजीपाला विक्री करुन कुटूंबाचे गुजराण करतात.म काल त्यांची इ.९ वीत शिकत असलेली मुलगी डिंपल सतिष पाटील ही सकाळी ७ वाजेच्या सुमारास तिच्या सायकलीने क्लासेससाठी निघाली होती.
धुळे चौफुलीजवळ समोरुन येणाऱ्या भरधाव डंपरने (क्र.जी.जे. १६ एडब्ल्यू ६६८८) डिंपलच्या सायकलीला धडक दिली. या अपघातात काही अंतरापर्यंत डाव्या बाजूच्या पुढील चाकात डंपरने डिंपलला फरफटत नेले. यात तिचे पोट, पाठ व हातापायांना गंभीर दुखापत झाली.
घटनास्थळी असणाऱ्या नागरिकांसह नातेवाईकांनी तिला तात्काळ खासगी रुग्णालयात नेले.मात्र, डिंपलची प्रकृती गंभीर असल्याने तिला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला. जिल्हा रुग्णालयात नेले असता कर्तव्यावरील डॉ.प्रज्ञा वळवी यांनी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास डिंपलची तपासणी केली असता तिला मृत घोषित केले. यादरम्यान डंपर चालक विनयकुमार रामचंद्र प्रसाद रा.अमरा पो.औरंगाबाद सरय्या, बिहार हा स्वत:हूनच पोलिस ठाण्यात हजर झाला होता.
रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन भरधाव वेगाने वाहन चालविल्याने व विद्यार्थीनीच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याने मृत डिंपलचे वडील सतिष आनंदा पाटील यांच्या फिर्यादीवरुन चालक विनयकुमार प्रसाद याच्याविरोधात शहर पोलिस ठाण्यात भादंवि कलम २७९, ३३८, ३३७, ३०४ (अ), मोटार वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक नंदा पाटील करीत आहेत. दरम्यान, काल सायंकाळी निंभेल येथे शोकाकूल वातावरणात डिंपलवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.