नंदुरबार l प्रतिनिधी
– भारतीय जनता पार्टीने सलग तिसऱ्यांदा खासदार डॉक्टर हिना गावित यांना नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी घोषित केली आहे. खासदार डॉक्टर हिना गावित यांना उमेदवारी घोषित होताच नंदुरबार लोकसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील आठही तालुक्यांमध्ये त्यांच्या समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोषात आनंद साजरा केला.
दिनांक 13 मार्च 2024 रोजी रात्री 7 वाजता दिल्लीतून ही उमेदवारी घोषित होत असताना इकडे खासदार हिना गावित मात्र नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील शिरपूर तालुक्यातल्या भटाणे येथे आदिवासी महिलांना वस्तू वाटप करण्यात मग्न होत्या. डॉक्टर हिना गावित यांना उमेदवारी घोषित झाल्याचे वृत्त पसरताच शिरपूर आणि शहादा मार्गावर अनेक ठिकाणी प्रत्यक्ष भेटून अनेकांनी त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव केला, तर ऑल टाईम कार्यरत राहणाऱ्या त्यांच्या चाहत्या तरुण वर्गाने देखील सोशल मीडियावर अभिनंदन आणि आनंद व्यक्त करणाऱ्या विविध पोस्टचा जणू पाऊस पाडला.
नकारात्मक प्रवृत्तींना दिला धोबीपछाड
खासदार डॉक्टर हिना गावित यांना उमेदवारी देऊ नका; अशी उघडपणे शिंदे गटाचे येथील नेते माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी व काही संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी महायुतीच्या वरिष्ठांकडे मागणी केली होती. त्याचबरोबर गावित परिवाराची घराणेशाही थांबवा असे सांगून भाजपातीलच काही जणांनी छुपी मोहीम राबवल्याची चर्चा सर्वत्र होती. या गोष्टींचा आधार घेऊन प्रसिद्धी माध्यमातून यंदा खासदार डॉक्टर हिना गावित यांच्या उमेदवारीला कात्री लागणार, भारतीय जनता पार्टी डॉक्टर हिना गावित यांना पर्यायी उमेदवार शोधणार; अशा निराधार बातम्या सातत्याने पसरवल्या जात होत्या आणि नंदुरबार लोकसभा मतदारसंघात मोठा संभ्रम निर्माण केला जात होता. तथापि भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठांनी खासदार डॉक्टर हिना गावित यांची उमेदवारी घोषित करून त्या सर्व नकारात्मक चर्चांना आता पूर्णविराम दिला आहे. आपल्या विकासात्मक कार्याच्या बळावर डॉक्टर हिना गावित यांनी नकारात्मक प्रवृत्तींना अखेर धोबीपछाड दिला, अशी प्रतिक्रिया आता गाव पातळीवरून उमटत आहे.
*खासदार डॉक्टर हिना गावित यांची जमेची बाजू*
खासदार डॉक्टर हिना गावित या महाराष्ट्राचे विद्यमान आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित आणि नंदुरबार जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष डॉक्टर कुमुदिनी गावित यांच्या जेष्ठ कन्या तसेच नंदुरबार जिल्हा परिषदेच्या विद्यमान अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित यांच्या ज्येष्ठ भगिनी आहेत. डॉक्टर विजयकुमार गावित हे 2014 साली महाराष्ट्रातील काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी सरकारमध्ये वैद्यकीय उच्च शिक्षण मंत्री होते त्यावेळी डॉक्टर हिना गावित या एमबीबीएस ची परीक्षा देत होत्या. आरोग्य विषयक सेवाभावी कार्यामुळे आणि व्यापक उपक्रम राबवल्यामुळे युवा नेतृत्व म्हणून त्या बहुपरिचीत झाल्या होत्या. त्याची दखल घेऊन भाजपाचे नरेंद्र मोदी आणि तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंग यांनी भारतीय जनता पार्टी कडून थेट लोकसभेची उमेदवारी दिली होती. या वरिष्ठ नेत्यांचा लाभलेला आशीर्वाद ही त्यांची मोठी जमेची बाजू आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जय भिम अड्डा देशाचे गृहमंत्री अमित भाई शहा आणि खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या कार्यशैलीचे चाहते आहेत. देश पातळीवरील जल जीवन मिशन सारख्या समित्यांमध्ये डॉक्टर हिना गावित यांनी सदस्यत्व भुषवले, पंतप्रधानांच्या समावेत आयोजित स्नेहभोजनाला निवडक खासदारांमध्ये खासदार डॉक्टर हिना गावित यांचा समावेश राहिला त्याचबरोबर संसदेतील कामकाजात त्यांना उच्च संधी दिली गेली. देश पातळीवरच्या कारभारात नंदुरबारच्या लोकप्रतिनिधीला उच्च स्थान लाभण्याची ही नंदुरबार जिल्ह्याच्या इतिहासातली पहिली वेळ आहे.
2014 च्या त्या निवडणुकीत खासदार डॉक्टर हिना गावित यांनी काँग्रेसचे तत्कालीन टॉप टेन खासदार माणिकराव गावित यांना पराभूत करण्याचा विक्रम स्थापित केला. 11 लाख 16 हजार 676 इतक्या झालेल्या मतदानापैकी 5 लाख 79 हजार 486 मते प्राप्त करून खासदार डॉक्टर हिना गावित विजयी झाल्या होत्या. तेव्हापासून काँग्रेसच्या पारंपारिक आदिवासी मतपेटीला छेद गेला असून एक गठ्ठा मतदार भाजपाकडे वळला आहे. या रेकॉर्ड ब्रेक कामगिरीचे भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ वर्तुळात अद्याप कौतुक केले जाते. त्याच मार्गावर कायम राहून खासदार डॉक्टर हिना गावित यांनी मागील दहा वर्षात वडील डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या मार्गदर्शनाखाली विक्रम स्थापित करणारे विकास कार्य घडवले. ज्यामुळे 2019 यावर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत देखील दुसऱ्यांदा भाजपाने त्यांना उमेदवारी दिली. तेव्हा 10 लाख 95 हजार 498 झालेल्या मतदानापैकी चक्क ५०.७% म्हणजे 6 लाख 39 हजार 136 मते प्राप्त करून डॉक्टर हिना गावित या दुसऱ्यांदा विजयी झाल्या होत्या. काँग्रेसचे उमेदवार माजी मंत्री के सी पाडवी यांना 5 लाख 43 हजार 507 मते मिळाली होती.
ही दुसरी टर्म मिळाल्यानंतर खासदार डॉक्टर हिना गावित यांच्या कार्याचा आलेख आणखी उंचावला. नंदुरबार जिल्ह्यातील मध्यप्रदेश सीमेवरच्या नर्मदा काठापर्यंत आपल्या विकासाची गंगा नेऊन रस्ते वीज पाणी पोहोचवण्याचा चमत्कार सर्वप्रथम त्यांनी घडवला असे भाजपातून म्हटले जाते. एकीकडे दुर्गम भागाचा विकास घडवत असतानाच दुसरीकडे दिल्ली दरबारात देखील त्यांनी आपल्या अभ्यासूपणाचा झेंडा रोवला. आदिवासींसाठी दिल्या जाणाऱ्या योजनांवर, विविध समस्यांवर लोकसभेत त्यांनी वेळोवेळी अभ्यासपूर्ण भाषण केले. संसदेत पूर्ण वेळ उपस्थित राहून सर्वाधिक प्रश्न मांडणाऱ्या खासदारांपैकी त्या गणल्या जातात. अलीकडेच राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर धन्यवाद प्रस्ताव मांडणारे त्यांचे संसदेतील भाषण गाजले. हे सर्व त्यांची जमेची बाजू असून तिसऱ्यांदा उमेदवारीची संधी मिळायला कारणीभूत ठरले आहे.
*खासदार डॉक्टर हिना गावित यांची प्रतिक्रिया*
“भारतीय जनता पार्टीने मला सलग तिसऱ्यांदा नंदुरबार लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी करण्याची संधी दिली आणि तिसऱ्यांदा उमेदवारी घोषित केली म्हणून मी देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा केंद्रीय गृहमंत्री अमित भाई शहा महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र भाजपाचे नेते देवेंद्रजी फडणवीस या सर्वांचे मनापासून आभार मानते मागील दहा वर्षात नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील तळागाळाच्या लोकांसाठी विकासाची कामे करता आली मतदारसंघाचा विकास करून दाखवता आला आता पुन्हा संधी मिळत असल्यामुळे यापुढेही नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील अधिकाधिक चांगले काम करून दाखवण्याचा प्रयत्न करीन
– खा. डॉ. हिना गावित.