नंदुरबार l प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे येथील रेल्वे स्थानकावर ‘एक स्थानक एक उत्पादक’ या योजनेचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकासमंत्री डॉक्टर विजयकुमार गावित नंदुरबार लोकसभा मतदार संघाच्या खासदार डॉक्टर हिना गावित यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी ‘एक स्थानक एक उत्पादक’ अंतर्गत लावण्यात आलेल्या स्टॉलला उपस्थित मान्यवरांनी भेट दिली. उपस्थितांना संबोधित करत खासदार डॉक्टर हिना गावित यांनी अनेक वर्षे रखडलेले नंदुरबार जळगाव रेल्वे मार्ग चे दुहेरीकरण पूर्णत्वास आणणे, रेल्वे मार्गावरील धान्य गोदाम नंदुरबार येथे कार्यरत करणे, नंदुरबार रेल्वे स्थानकाला आधुनिक सुविधा मिळवून देणे या कामांचा उल्लेख करून नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील मतदारांना अनेक वर्षांपासून रखडलेल्या रेल्वे सुविधा मिळवून देण्यासाठी एक खासदार म्हणून कसे प्रयत्न केले याची थोडक्यात माहिती दिली.
मोदी सरकारमुळे सामान्य लोकांना प्रभावी स्वरूपात रेल्वे सेवा प्राप्त झाल्याचे सांगून त्यापुढे म्हणाले की, अमृत भारत स्टेशन योजनेची उपलब्उपलब्धी त्याचाच भाग आहे. सुमारे 11 कोटी रुपयांचा निधी नंदुरबार रेल्वे स्थानकाच्या आधुनिकीकरणासाठी प्राप्त झाला आहे आणि चौथा प्लॅटफॉर्म निर्माण करणे, वृद्ध व दिव्यांग प्रवाशांसाठी बॅटरीवर चालणारे चेअर उपलब्ध करणे, दोन प्लॅटफॉर्मवर लिफ्ट बसवणे यासारख्या सुविधा लवकरच उपलब्ध होतील अशी माहिती दिली.
रेल्वे विभागाच्या प्रमुख वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष निलेश माळी, जिल्हा उपाध्यक्ष सदानंद रघुवंशी भाजपा, महिला पदाधिकारी सपना अग्रवाल सविता जयस्वाल यांच्यासह रेल्वेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.