नंदुरबार l प्रतिनिधी
आदिवासी हेच जल, जंगल आणि जमीन व देशाचे मुळ मालक आहे. मोदी सरकारने मोठ्या उद्योगपतींचे कर्ज माफ केले आहे. यात आदिवासी, शेतकरी, शेतमजूरांचे किती कर्ज माफ झाले? असा सवाल उपस्थित करत कॉँग्रेस नेते राहूल गांधी यांनी भाजपा सरकारवर हल्लाबोल केला आहे.
कॉँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रेची नंदुरबारातून सुरुवात करण्यात आली आहे. यानिमित्त आयोजित सभेप्रसंगी राहूल गांधी यांनी भाजपा सरकारचा खरपूस समाचार घेतला.
कॉँग्रेसचे नेते राहूल गांधी भारत जोडो न्याय यात्रेनिमित्त नंदुरबारात येणार असल्याने यानिमित्त गेल्या आठवडाभरापासून कॉँग्रेसची तयारी सुरु होती.दरम्यान, काल सकाळपासूनच शहरात ठिकठिकाणी चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. वाहतूक व्यवस्था सुरळीत रहावी यासाठी पोलिस प्रशासनाच्यावतीने खबरदारी घेण्यात आली होती. दुपारी सव्वादोन वाजेच्या सुमारास नंदुरबार येथील पोलिस मुख्यालयाच्या मैदानावरील हेलिपॅडवर राहूल गांधींचे हेलिकॉप्टरने आगमन झाले. यानंतर उशिर झाला असल्याने रोड शो रद्द करत ते थेट कारने सी.बी.मैदानावरील सभास्थळी दाखल झाले. या दरम्यान, ठिकठिकाणी राहुल गांधींना पाहण्यासाठी चाहत्यांनी गर्दी केली होती. राहुल गांधी सभास्थळी दाखल झाल्यानंतर कॉँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये एकच उत्साह संचारला होता.
देशात शांतता, समृद्धी नांदावी यासाठी नवस मानलेली आदिवासी न्याय होळी कॉँग्रेस नेते राहूल गांधी यांच्या हस्ते प्रज्वलित करण्यात आली. याप्रसंगी असली, पाडामुंड, अस्तंभा येथील सुमारे ४० ते ५० युवतींच्या एका पथकाने आदिवासी होळी नृत्य सादर केले.
यावेळी राहूल गांधी यांनी देखील देवमोगरा माता की जय म्हणत होळीभोवती प्रदक्षिणा घेतली व होळीचा प्रसादाचा दांडा पहिल्याच प्रयत्नात तोडल्याने उपस्थितांनी कौतूक देखील केले. सभेला सुरुवात झाल्यानंतर सभेदरम्यान राहूल गांधी म्हणाले की, भाजपा सरकारचा आदिवासींच्या जमीनीवर डोळा आहे. यामुळे भाजपा आदिवासींना वनवासी संबोधते. बड्या उद्योगपतींना जमीनी देऊन आदिवासींना भूमीहीन करण्याचे षडयंत्र भाजपाचे आहे. मात्र आदिवासी हेच जल, जंगल आणि जमीन व देशाचे मुळ मालक आहे. हेच सिद्ध करण्यासाठी सन २०१० मदद्ये कॉँग्रेसचे सरकार असतांना आधार कार्ड योजनेचा शुभारंभ नंदुरबार येथून केल्याचे गांधी यांनी सांगितले. २४ वर्षांचा मनरेगाचा पैसा इतकी रक्कम असलेले कर्ज मोदी सरकारने धनदांडग्यांचे माफ केले आहे. देशात ८ टक्के आदिवासी असतांना त्यांना भागिदारी किती? हा चिंतनाचा विषय असल्याचे राहूल गांधी म्हणाले. भारत सरकार १०० रुपये खर्च करत असेल तर त्यात आदिवासींना मिळणारा लाभ अवघा १० पैसे इतका आहे. भारतात चोहीकडे अन्याय आणि अत्याचार होत आहे. आदिवासी, दलितांच्या जमीनी संपादीत केल्या जात असून जल, जंगल, जमिनीपासून आदिवासींना वंचित ठेवले जात आहे. मोठ्या शाळा, महाविद्यालय, रुग्णालये यामध्ये कोठेही आदिवासींना थारा नसल्याचे देखील राहूल गांधी यांनी सांगितले. भारत जोडो न्याय यात्रेच्या माध्यमातून जातीनिहाय जनगणना करण्यात यावी, आर्थिक सर्वे करण्यात यावा, आदिवासींना ८ टक्के भागिदारी देण्यात यावी, शेतकऱ्यांसाठी एमएसपी कायदा करण्यात यावा, आदिवासी शेतकऱ्यांच्या जमीनी देण्यात याव्या यासारख्या विविध मागण्यांसाठी लढा सुरु असल्याचे राहूल गांधी यांनी सांगितले. दरम्यान, कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपाच्या अत्याचारी व्यवस्थेचे उत्तर देण्यासाठी कॉँग्रेसची लढाई सुरु आहे. महिला अत्याचाराची घटनांमध्ये वाढ झालेली असतांना न्याय मिळत नाही. शोषित, पिडीत समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी कॉँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा सुरु असल्याचे सांगितले.
सुत्रसंचालन विष्णू जोंधळे तर आभार जिल्हा कॉँग्रेस कमिटी अध्यक्ष आ.शिरीष नाईक यांनी मानले. दरम्यान, कायदा आणि सुवस्थेच्या दृष्टीने पोलिस अधिक्षक श्रवण दत्त एस., अपर पोलिस अधिक्षक निलेश तांबे, उपविभागीय पोलिस अधिकारी संजय महाजन, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार खेडकर, शहर पोलिस निरीक्षक राहूल पवार यांच्या नेतृत्वाखाली सुमारे ३०० पोलिस कर्मचाऱ्यांसह एसआरपीएफचे प्लाटून असा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.