नंदुरबार l प्रतिनिधी
काँग्रेसचे नेते खा. राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा १२ मार्च रोजी जिल्हयात दाखल होणार असून या न्याय यात्रेचे नंदुरबार जिल्ह्यात आदिवासी न्याय यात्रा म्हणून घोषित करण्यात आले असल्याची माहिती माजी मंत्री ॲड. के.सी पाडवी यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
अखिल भारतीय काँग्रेसचे नेते खा.राहुल गांधी हे देशभर भारत जोडो न्याय यात्रेच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत आहे. आता महाराष्ट्रात ही यात्रा नंदुरबार जिल्ह्यात दाखल होवून महाराष्ट्रभर फिरणार आहे. या यात्रेची माहिती देण्यासाठी माजी आ ॲड. पाडवी यांनी पत्रपरिषद घेतली. याप्रसंगी काँग्रेसचे सेक्रेटरी बी.एम. संदिप, आ.शिरीषकुमार नाईक, काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप नाईक, माजी सभापती सी. के. पाडवी आदी उपस्थित होते. यावेळी आ.ॲड.के.सी.पाडवी यांनी सांगितले की, भारत जोडो न्याय यात्रेतून राहुल गांधी हे जनतेशी संवाद साधत आहेत.
आता गुजरातमार्गे ही यात्रा महाराष्ट्रात नंदुरबार जिल्ह्यातून दाखल होणार आहे. महाराष्ट्रात जाणाऱ्या भारत जोडो यात्रेचा शुभारंभही नंदुरबार जिल्ह्यातून दि.१२ मार्चरोजी होत आहे. या यात्रेनिमित्त राहुल गांधी हे स्वतः नंदुरबार येथे येत असून त्यांच्या उपस्थितीत ही यात्रा निघणार आहे.
ठरल्यानुसार ध्वज सेरेमनीचा कार्यक्रम नंदुरबार येथे होईल. तसेच दि.१२ मार्च रोजी दुपारी साडेबारा वाजता राहुल गांधी हे भारत जोडो न्याय यात्रेद्वारे नंदुरबार येथे दाखल होतील. या यात्रेचे रुपांतर जिल्ह्यापुरता मर्यादित म्हणुन आदिवासी न्याय यात्रा असे असेल. त्यानंतर धुळे, मालेगाव व नाशिक मार्गे ही भारत जोडो न्याय यात्रा मुंबई येथे जावून समारोप होणार आहे, असेही माजी आ. ॲड.के.सी. पाडवी यांनी यावेळी सांगितले.