नंदुरबार l प्रतिनिधी
जिल्ह्यातील प्रत्येक वाडापाडा आणि तेथील नागरिकांच्या आत्मनिरर्भतेसोबत भजन, अध्यात्म, क्रिडा यासारख्या सांस्कृतिक मुल्यांची जपणूक केली जाईल. तसेच नागरिकांच्या वैयक्तिक विकासासोबतच सामुहिक विकासासाठी शासन कटीबद्ध असल्याचे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केले आहे.
ते अक्कलकुवा येथे तळोदा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या माध्यमातून विविध वैयक्तिक व सामुहिक लाभाच्या योजनांसाठी लाभार्थ्यांना साहित्य व प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जि.प.अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, खासदार डॉ. हिना गावित, आमदार आमश्या पाडवी, जि.प.सदस्य, प्रताप वसावे व पंचक्रोशील सरपंच, स्थानिक अधिकारी, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना मंत्री डॉ. गावीत म्हणाले, अक्कलकुवा तालुक्यातील विद्युतीकरणासाठी आपण वारंवार पाठपुरावा केला असून येणाऱ्या काळात १३२ के.व्ही. चे विद्युत सबस्टेशन उभारण्याबरोबरच भगवान बिरसा मुंडा योजनेच्या माध्यमातून दुर्गम भागात बारमाही रस्त्यांचे जाळे विणले जाणार आहे. पिण्याच्या पाण्यासाठी मैलोंमैल होणारी पायपीट थांबवून जलजीवन मिशनच्या माध्यमातून घरोघरी आणि घरातल्या प्रत्येकासाठी पाणी उपलब्ध करून दिले जात आहे. शेतात विजेसोबत सिंचनसुविधा निर्माण करण्यासाठी शासन-प्रशासन स्तरावर प्रयत्न सुरू असून मुख्यतः आदिवासी बांधवांना शेती अवजारे, कोंबडया, बकऱ्या गाईंच्या वितरणातून आत्मनिर्भर होण्यासाठी मदत करण्याबरोबरच एखादा व्यवसाय सुरु करण्यासाठी अल्प दरात कर्ज दिले जाणार आहे. याशिवाय आदिवासी तरुण-तरुणींसाठी प्रशिक्षण, खावटी कर्ज, मृद्संधारण, वनीकरण अशा योजनाही राबवल्या जात असून केंद्रीय सहाय्याच्या योजनांतूनही घरे बांधणे, महिलांना शेतीपूरक उद्योग अथवा जोडधंद्यासाठी सहाय्य, बांबू रोपवाटिका लागवडीचे प्रशिक्षण याशिवाय निरनिरळ्या ठिकाणांच्या गरजांनुसार काही विशेष, अभिनव व तातडीच्या योजना उत्पन्नवाढीच्या, प्रशिक्षणाच्या वा इतर कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी आदिवासी विकास विभागामार्फत सुरू आहे.
या कार्यक्रमात जि.प.अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, खासदार डॉ. हिना गावित, आमदार आमश्या पाडवी यांचीही भाषणे झाली.
या झालेल्या कार्यक्रमात
गॅस जोडणी- ६२९, शेळी महिला बचत गट- ३१, गाय गट निवड पत्र-१२१ (अक्कलकुवा),७१ (तळोदा), वैयक्तिक वन हक्क शेळी गट-११६, क्रिकेट साहित्य- ११० टीम्स, ४७ बचत गटांन प्रत्येकी १० हजार रूपयांचे धनादेश वितरण, २५३ भजनी मंडळांना साहित्य वितरण करण्यात आले.