नंदुरबार l प्रतिनिधी-
विहीर दुरुस्तीचे काम बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत करून देण्यासाठी तडजोडीअंती साडे सहा हजाराची लाच स्वीकारताना नवापूर तालुक्यातील देवळीपाडा येथील सरपंच प्रदीप गावित व पंचायत समिती कृषी विस्तार अधिकारी अशोक दौलत बोरसे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात ताब्यात घेऊन अटक केली आहे.
देवळीपाडा येथील तक्रारदाराच्या तक्रारीनुसार त्यांच्या आईच्या नावावर देवळीपाडा शिवारात शेतजमीन असून या शेतात असलेली विहीर दुरुस्तीचे काम बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत करण्याकरता पंचायत समिती कृषी विस्तार अधिकारी अशोक बोरसे यांनी सात हजारांची लाच मागितली होती.
मात्र तक्रारदाराला लाच द्यायची नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर सापळा रचण्यात आला. आणि नवापूर येथील हॉटेल शिवम जवळ सरपंच प्रदीप गावित व विस्तार अधिकारी अशोक बोरसे या दोघांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई नंदुरबार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक राकेश चौधरी यांच्यासह पथकातील पोलीस निरीक्षक समाधान वाघ, विजय ठाकरे, देवराम गावित, सुभाष पावरा, विलास पाटील, नरेंद्र पाटील, संदीप नावडेकर, जितेंद्र महाले आदींनी केली आहे.