नंदुरबार | प्रतिनिधी-
नंदुरबार शहरातील कोरीट नाका येथील स्टेट बँकेच्या शाखेच्या बाहेर असलेले एटीएम मशिन पाच चोरटयांनी चोरुन नेल्याची धक्कादायक घटना काल 22 फेब्रुवारी रोजी पहाटे पावणे चार वाजेच्या सुमारास घडली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, कल दि.२२ फेब्रुवारी रोजी पहाटे ३.४० वाजेच्या सुमारास शहरातील कोरीट नाका स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेबाहेर असलेल्या एटीएम मशिनच्या कॅबिनमध्ये पाच जण तोंडावर रुमाल बांधून शिरले. त्या ठिकाणी असलेले एटीएम मशिन सर्वांनी मिळून उचलून बाहेर आणले.
बाहेर उभ्या असलेल्या चार चाकी वाहनात त्यांनी ते मशिन टाकून पलायन केले. सदर एटीएम मशिनमध्ये काल सुमारे ३० लाखांची रोकड टाकण्यात आली होती. दिवसभरात सुमारे चार लाखांची रोकड ग्राहकांनी काढल्यामुळे सुमारे २६ लाखांची रोकड मशिनमध्ये शिल्लक होती. ही सर्व रोकड चोरटयांनी लंपास केली आहे.
काल दि.22 फेब्रुवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास एटीएम मशिन चोरीस गेल्याचे लक्षात आल्याने बँकेचे अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली.
मात्र, एटीएम मशिनची देखभाल, दुरुस्ती, पैशांचा भरणा आदींची जबाबदारी सीएमएस या कंपनीवर असल्याने या कंपनीचे अधिकारी, कर्मचारी सायंकाळच्या सुमारास नाशिक येथून नंदुरबारात दाखल झाले. तोपर्यंत पोलीस ठाण्यात कुठलीही नोंद करण्यात आली नव्हती. रात्री उशिरापर्यंत याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याचे काम सुरु होते.
दरम्यान, एटीएम मशिनच्या कॅबिनमध्ये असलेल्या सीसीटीव्हीच्या कॅमेर्यामध्ये ही घटना कैद झाली असून पहाटे ३.४० ते ४ वाजेदरम्यान ही घटना घडली आहे. सदर चोरीस गेलेले एटीएम मशिन हे नंदुरबार-प्रकाशा रस्त्यावरील कोळदे गावाजवळ फेकलेले आढळून आले आहे.
या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. पोलीस अधीक्षक श्रवण दत्त हे स्वतः सकाळपासून या घटनेच्या मागावर होते. परंतू फिर्याद देणारे कंपनीचे अधिकारी सायंकाळी उशिरा आल्याने पोलीसांत नोंद करण्यास विलंब झाला. तरीही पोलीस अधीक्षकांनी विविध पथके तयार करुन तपासासाठी रवाना केले आहेत.