नंदुरबार | प्रतिनिधी
येथील जिल्हा परिषदेच्या अकरा गटांसाठी घेण्यात आलेल्या पोटनिवडणुकीत भाजपाने चार, कॉंग्रेस व शिवसेनेने प्रत्येकी तीन तर राष्ट्रवादी कॉंग्रेसने एका जागेवर विजय मिळविला आहे. या निकालामुळे जिल्हा परिषदेतील भाजपाचे संख्याबळ हे तीनने घटले असून कॉंग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेच्या प्रत्येकी एक जागा वाढल्या आहेत. दरम्यान, खोंडामळी व मांडळ या गटातील पराभूत उमेदवार अत्यंत कमी मतांनी पराभूत झाले आहेत.
जिल्हा परिषदेच्या ५६ गट आणि ११२ गणांसाठी डिसेंबर २०१९ मध्ये निवडणूका घेण्यात आल्या होत्या. या निवडणुकीत कॉंग्रेस आणि भाजपाने प्रत्येकी २३, शिवसेनेने ७ तर राष्ट्रवादीने ३ जागांवर विजय मिळविला होता. मात्र, मार्च महिन्यात आरक्षणाच्या मुद्दयावरुन जिल्हा परिषदेच्या ओबीसी प्रवर्गातील ११ उमेदवारांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले होते. या ११ उमेदवारांमध्ये भाजपाचे ७ तर कॉंग्रेस व शिवसेनेच्या प्रत्येकी दोन उमेदवारांचा समावेश होता. सदस्यत्व रद्द झाल्याने जुलै महिन्यात ११ गट व १४ गणांसाठी पोटनिवडणुकीची प्रक्रिया राबविण्यात आली. परंतू उमेदवारी दाखल करण्याच्या प्रक्रियेनंतर कोरोनाच्या पार्श्वभुमीवर सदर निवडणूक स्थगित करण्यात आली होती. मात्र, आता कोरोनाची स्थिती समाधानकारक असल्याने निवडणूकीची प्रक्रिया पुन्हा राबविण्यात आली. काल दि. ५ ऑक्टोबर रोजी ११ गट व १३ गणांसाठी मतदान घेण्यात आले. एका गणाची निवडणूक बिनविरोध झाली होती.
आज येथील वखार महामंडळाच्या गोदामात मतमोजणीच्या प्रक्रिया राबविण्यात आली. यात भाजपाने चार, कॉंग्रेस व शिवसेनेने प्रत्येकी ३ तर राष्ट्रवादी कॉंग्रेसने एका जागेवर विजय मिळविला आहे.
नंदुरबार तालुका
नंदुरबार तालुक्यात ५ गटांसाठी मतदान घेण्यात आले.
कोळदे गट
कोळदे गटात भाजपाच्या सुप्रिया विजयकुमार गावित यांंना ६ हजार ७०७ मते मिळाली. त्यांच्या प्रतिस्पर्धी शिवसेनेच्या आशा समीर पवार यांना ५ हजार ३३८ मते मिळाली. त्यामुळे सुप्रिया गावित या १ हजार ३६९ मतांनी विजयी झाल्या.
कोपर्ली गट
कोपर्ली गटात शिवसेनेचे राम चंद्रकांत रघुवंशी यांना ८ हजार ६६८ मते मिळाली. त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपाचे पंकज प्रकाश गावित यांना ५ हजार ६६४ मते मिळाली. त्यामुळे राम रघुवंशी हे ३ हजार ४ मतांनी विजयी झाले.
शनिमांडळ गट
शनिमांडळ गटात सेनेच्या जागृती सचिन मोरे यांना ६ हजार २९९ मते मिळाली. भाजपाच्या रेखा सागर धामणे यांना ६ हजार १०९ मते मिळाली. त्यामुळे सेनेच्या जागृती मोरे या १९० मतांनी विजयी झाल्या.
रनाळे गट
रनाळे गटात शिवसेनेच्या शकुंतला सुरेश शिंत्रे यांना ७ हजार ९७ मते मिळाली तर भाजपच्या रीना पांडुरंग पाटील यांना ५ हजार ७९६ मते मिळाली. त्यामुळे सेनेच्या शकुंतला शिंत्रे या १ हजार ३०१ मतांनी विजयी झाल्या.
खोंडामळी गट
खोंडामळी गटात भाजपचे शांताराम साहेबराव पाटील हे अवघ्या ८७ मतांनी विजयी झाले. त्यांना ७ हजार ७७ मते मिळाली तर त्यांचे प्रतिस्पर्धी सेनेचे गजानन भिका पाटील याना ६ हजार ९९० मते मिळाली.
शहादा तालुका
शहादा तालुक्यात ४ गटांची पोटनिवडणूक घेण्यात आली. यात भाजपने २ तर कॉंग्रेस व राष्ट्रवादीने प्रत्येकी एका जागेवर विजय मिळविला.
म्हसावद गट
म्हसावद गटात कॉंग्रेसच्या हेमलता अरुण शितोळे याना ५ हजार ८०४ मते मिळाली. भाजपचे पाटील शशिकांत गोविद यांना २ हजार ८८१ मते मिळाली. अपक्ष उमेदवार पाटील भगवान खुशाल यांना २ हजार ६९६ मते मिळाली. त्यात हेमलता शितोळे या २ हजार ९२३ मतांनी विजयी झाल्या.
लोणखेडा गट
लोणखेडा गटात भाजपच्या पाटील जयश्री दिपक विजय उमेदवार यांना ७ हजार ३५७ मते मिळाली. कॉंग्रेसचे गणेश रघुनाथ पाटील यांना ३ हजार १५३ मते मिळाली. जयश्री पाटील या ४ हजार २०४ मतांनी विजयी झाल्या.
पाडळदा गट
पाडळदा गटात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शेवाळे मोहनसिंग पवनसिंग यांना ४ हजार ८०३ मते मिळाली. कम्युुनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे पाटील ईश्वर मदन याना ३ हजार ८० मते मिळाली. तर भाजपचे पाटील धनराज काशिनाथ यांना ४ हजार २७४ मते मिळाली. मोहन शेवाळे हे ५२९ मतांनी विजयी झाले.
कहाटूळ गट
कहाटूळ गटात भाजपाच्या ऐश्वर्यादेवी जयपालसिंग रावल यांना ५ हजार ८२० मते मिळाली असून त्यांनी कॉंग्रेसच्या मंदा रामराव बोरसे यांचा पराभव केला. बोरसे यांना ५ हजार ३६२ मते मिळाली. त्यामुळे श्रीमती रावल या ४५५ मतांनी विजयी झाल्या.
अक्कलकुवा तालुका
अक्कलकुवा तालुक्यात दोन गटात पोटनिवडणूक झाली.
अक्कलकुवा गट
अक्कलकुवा गटात कॉंग्रेसच्या सुरय्या मक्राणी विजयी झाल्या. त्यांना ३ हजार ६ मते मिळाली. त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपाच्या वैशाली कपिलदेव चौधरी यांना १ हजार ४५७ मते मिळाली. मक्राणी या १ हजार ६४३ मतांनी विजयी झाल्या.
खापर गट
खापर गटात कॉंग्रेसच्या गीता चांद्या पाडवी या विजयी झाल्या. त्यांना ६ हजार ५९७ मते मिळाली. त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपचे नागेश दिलवरसिंग पाडवी यांना ४ हजार ९३१ मते मिळाली. गीता पाडवी या १ हजार ६६६ मतांनी विजयी झाल्या. गीता पाडवी या राज्याचे आदिवासी विकास मंत्री ऍड.के.सी.पाडवी यांच्या भगिनी आहेत.