नंदुरबार l प्रतिनिधी
राष्ट्रीय सेवा योजना श्रमसंस्कार शिबिरातील युवकांनी ग्रामीण भागात समाजपयोगी कामे करावीत. मला समाजाने काय दिले यापेक्षा मी समाजाला काय देऊ शकतो या भावनेने काम करावे. असे प्रतिपादन जिजामाता शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती शोभाताई दिलीपराव मोरे यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव व जिजामाता शिक्षणशास्त्र महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय सेवा योजना हिवाळी श्रमसंस्कार शिबिराच्या अध्यक्षीय भाषणातून सांगितले. दत्तक गाव वाघोदा ग्रामपंचायत येथे राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे सात दिवसीय निवासी शिबिर आयोजित केले आहे.
सदर शिबिराचे उद्घाटन सेवानिवृत्त सीआयएफएस जवान दीपक निंबा ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटन प्रसंगी श्री ठाकूर म्हणाले की, युवकांनी सामाजिक बांधिलकी ठेवावी. माता व मातृभूमीची सुरक्षा व संरक्षणासाठी नेहमी तत्पर राहिले पाहिजे. आजतागायत अनेक युवकांनी देश सेवेसाठी बलिदान दिले आहे. जीवनाचा प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण आणि प्रत्येक श्वास मातृभूमीसाठी जगणे हीच स्वातंत्र्य सैनिकांना आपली खरी आदरांजली असेल, असे त्यांनी सांगितले.
राष्ट्रीय सेवा योजना शिबिराच्या माध्यमातून महाविद्यालयीन युवकांवर श्रमसंस्कार, राष्ट्रसेवा, देशभक्ती, श्रमदान व बौद्धिक संस्कार केले जातात. निवासी शिबिरातील विविध उपक्रमांद्वारे युवकांचा सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास होतो. असे प्राचार्य डॉ संजय शिंदे यांनी सांगितले.
सक्षम युवा समर्थ भारत या अनुषंगाने राष्ट्रबांधणीत युवकांची भूमिका महत्त्वाची आहे असे प्रतिपादन डॉ. नरेंद्र खैरनार यांनी केले. राष्ट्रीय सेवा योजना हिवाळी समसंस्कार शिबिराचा हेतू कार्यक्रम अधिकारी प्रा. संदीप भदाणे यांनी प्रास्ताविकेतून सांगितला. शिबिराला श्रीमती शोभाताई मोरे, दीपक ठाकूर, डॉ. नरेंद्र खैरनार, ग्रामसेवक शरद पवार, प्राचार्य डॉ. संजय शिंदे कार्यक्रम अधिकारी प्रा. संदीप भदाणे पालक प्रतिनिधी सतीश सोनवणे, अनिल पवार यांचे मौलिक मार्गदर्शन लाभले. यावेळी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व शिबिरार्थी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन विद्यार्थी प्रतिनिधी सोनल अहिरे यांनी केले.