नंदुरबार l प्रतिनिधी
हस्ती-जिभाऊ करंडकच्या माध्यमातून नाट्यकर्मींना त्यांचे कलागुण सादर करण्यासाठी हक्काचा रंगमंच प्राप्त झाला आहे. या एकांकीकेच्या माध्यमातून सामाजिक प्रश्न मांडता येवू शकतात. नाटक हे समाज प्रबोधन करण्याचे उत्तम माध्यम आहे, असे प्रतिपादन माजी प्राचार्य बी.एस.पाटील यांनी केले. ते हस्ती-जिभाऊ करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.
गाडगेबाबा शैक्षणिक व सांस्कृतिक सेवा मंडळ शिंदे, ता.जि.नंदुरबार आयोजित राज्य पुरस्कार शिक्षक जयदेव लिंबा पेंढारकर तथा जिभाऊ यांच्या स्मरणार्थ दि हस्ती को-ऑप.बँक लि. प्रायोजित हस्ती-जिभाऊ करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात उद्घाटन झाले.
या उद्घाटनाप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ साहित्यिक दिनानाथ मनोहर, दि हस्ती को-ऑपरेटिव बँक लि. नंदुरबार शाखेचे कमिटी सदस्य प्रकाश नानकानी, माजी नगरसेवक संजय चौधरी, सामाजिक कार्यकर्त्या सुलभा महिरे, जय हिंदळा माता ट्रायबल एज्युकेशन सोसायटीचे सचिव गिरीश वसावे, कृषी अधिकारी विजय मोहिते, साहित्यीक प्रभाकर भावसार, सिने दिग्दर्शक श्याम रंजनकर, आत्माराम इंदवे, साहित्यीक पितांबर सरोदे, कृषि अधिकारी राकेश वाणी, दिलीप खैरनार, परिक्षक डॉ.जितेंद्र पानपाटील, कुणाल मेश्राम, प्रदीप कांबळे आदी उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलतांना श्री.पाटील म्हणाले की, आपल्या अंगी असलेली सुप्त कला जोपासून तिला व्यक्त केले पाहीजे. जेणेकरुन भविष्यातील कलावंत उदयास येतील. जिभाऊ करंडकच्या माध्यमातून नंदुरबार जिल्ह्यातील कलावंतांना देखील उत्तम असे रंगमंच प्राप्त होत आहे. यावेळी प्रास्ताविकेतून आयोजक नागसेन पेंढारकर यांनी हस्ती-जिभाऊ करंडक या स्पर्धेची भुमिका मांडत मागील बारा वर्षांचा आढावा मांडला. सदर स्पर्धा नाट्य कलावंत व नाट्य रसिक तयार करण्याची प्रक्रिया आहे, असेही त्यांनी सांगितले.
सूत्रसंचालन व आभार राजेश जाधव यांनी मानले. सदर स्पर्धेत कलाशिक्षक चिदानंद तांबोळी यांचे चित्रप्रदर्शनाचेही आयोजन करण्यात आले आहे.
शनिवारी एकूण पाच एकांकिकांचे सादरीकरण झाले. सदर सादरीकरण रात्री उशिरापर्यंत सुरू होते. आज रविवारी रोजी दिवसभरातून एकूण ६ एकांकिका सादर होणार असून या स्पर्धेचे बक्षीस वितरण सायंकाळी ५.३० वाजता महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम तथा सिनेमा नाट्य अभिनेते हेमंत पाटील व कुणाल मेश्राम यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.
यावेळी विशेष अतिथी म्हणून दि हस्ती को-ऑप लि. दोंडाईचाचे चेअरमन कैलास जैन, नंदुरबार जिल्हा प्राथमिक व माध्यमिक विभागाचे उपशिक्षणाधिकारी डॉ. युनूस पठाण, एस.व्ही.एन.आय.टी. सुरतचे प्रा.डॉ.शिवानंद सुर्यवंशी तर मान्यवर म्हणून कृषी अधिकारी नंदकिशोर सुर्यवंशी, उद्योजक आनंद जैन, जेष्ठ पत्रकार तथा साहित्यिक रमाकांत पाटील, सिने निर्माता तथा सुप्रसिद्ध मूर्तिकार मनोज वसईकर, रोटरी क्लब ऑफ नंदनगरीचे अध्यक्ष फखरुद्दीन जलगुणवाला, स्टेट बँक ऑफ इंडिया हाऊसिंग लोन कौन्सिलर मनीष बिरारे, बालरोगतज्ञ डॉ.समिधा नटावदकर-पाने, मुख्याध्यापक बी.एस.पवार, दंतचिकित्सक डॉ.प्रियंका संजय चौधरी यांची उपस्थिती राहणार आहे.
तसेच जिभाऊ करंडक आयोजन समितीतर्फे दरवर्षी दिला जाणारा मानाचा दिपस्तंभ पुरस्कार यंदा आदिवासी देवमोगरा एज्युकेशन सोसायटी नटावदचे अध्यक्ष तथा नंदुरबार जिल्हा कला व क्रीडा अकादमीचे अध्यक्ष राजेंद्रकुमार गावीत यांना मान्यवरांच्या हस्ते देण्यात येणार आहे. उद्या सादर होणार्या एकांकिका पाहण्यासाठी रसिक प्रेक्षकांनी जास्तीत जास्त उपस्थिती लावावी असे आवाहन आयोजक नागसेन पेंढारकर, मनोज सोनार, राजेश जाधव, आशिष खैरनार, यांच्यासह आयोजन समितीच्या सर्व सदस्यांनी केले आहे.
आज रविवारी रोजी सादर होणार्या एकांकिका
सकाळी ११ ते १२ वाजता – सुरवंटाचं डिफ्रॅगमेंटेशन ( युवा रंग फाउंडेशन नंदुरबार), दुपारी १२ ते १ वाजता – रंसुरी (विजिकिषा थिएटर नाशिक), दुपारी १ ते २ वाजता – संपर्क क्रमांक (कलासक्त, अंधेरी मुंबई), दुपारी २.३० ते ३.३० वाजता – सेकंड हॅन्ड (महात्मा गांधी शिक्षण मंडळ कला विज्ञान महाविद्यालय चोपडा), दुपारी ३.३० ते ४.३० वाजता – चांदणी (फ्लाईंग बर्ड फिल्म अँड थिएटर फाउंडेशन जळगाव), सायंकाळी ४.३० ते ५.३० वाजता – इंटरोगेशन (क्रिएटिव्ह कार्टी मुंबई)