नंदुरबार l प्रतिनिधी
आपल्या देशातील प्रत्येक बालक हा देशाचे भविष्य असून नंदुरबार सारख्या आकांक्षित जिल्ह्यात बालहक्कांच्या अंमलबजावणीसाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याची आवश्यकता असल्याचे मत, राष्ट्रीय बालहक्क आयोगाच्या सदस्या डॉ. दिव्या गुप्ता यांनी व्यक्त केले आहे.
त्या जिल्हाधिकारी कार्यालयात बालहक्कांचे उल्लंघन आणि त्यांच्या हक्कांपासून वंचित राहण्यासंबंधीच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी आयोजित शिबिर सुनावणीत मार्गदर्शन करताना बोलत होत्या.
यावेळी जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, अपर पोलीस अधिक्षक निलेश तांबे, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, राष्ट्रीय बालहक्क आयोगाचे सल्लागार सुशिल कुमार, सहाय्यक समेंद्र वत्स जिल्हा महिला व बालविकास अधिकारी राजेंद्र बिरारी हे उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना त्या म्हणाल्या, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बालकांच्या भविष्याकडे विशेष लक्ष केंद्रीत करण्याची आवश्यकता वेळोवेळी अधोरेखित केली आहे. बालकं ही देशाचा भविष्यकाळ आहेत. बालकं अडचणीत असतील तर देश अडचणीत आहे, त्यामुळे या बालकांच्या वर्तमानावर आपल्याला विशेष लक्ष केंद्रीत करण्याची गरज आहे. जिल्ह्यात बालहक्कांबाबातचे कायदे, नियम, त्यांची अंमलबजावणी, त्यात येणारे अडथळे, समोर असणारी आव्हाने आणि त्यावर उपाययोजना या सर्वांचा सर्वंकश अहवाल बालहक्क आयोग सरकारला सादर करणार आहे. नंदुरबार सारख्या दुर्गम जिल्ह्यात बालकांच्या सुरक्षित भविष्यासाठीची जी आव्हाने आहेत, त्यावर मात करण्यासाठी मोठा वाव आणि संधी असून त्यात नाविन्यपूर्ण संकल्पना राबवून समन्वयाने नियोजन करण्याची आवश्यकता असल्याचेही श्रीमती डॉ. गुप्ता यांनी यावेळी सांगितले.
आज झालेल्या सुनावणी शिबिरात 827 बालहक्कांच्या संदर्भातील तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यातील काही तक्रारींचे जागेवरच निराकरण करण्यात आले असून काही तक्रारी निराकरणासाठी संबंधित विभागांना पाठवण्यात येतील. या तक्रारींचे सात ते पंधरा दिवसात निराकरण करण्याच्या सूचना यावेळी डॉ. दिव्या गुप्ता यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या आहेत.
यावेळी राष्ट्रीय बालहक्क आयोगाच्या सदस्या डॉ. दिव्या गुप्ता यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात लावलेल्या विविध विभांगांच्या दालनांना सल्लागार सुशिल कुमार, सहाय्यक समेंद्र वत्स, जिल्हाधिकारी धनंजय गोगटे बालके व महिलांसमवेत भेट दिली. शिबिर सुनावणीचे प्रास्ताविक जिल्हा महिला व बालविकास अधिकारी राजेंद्र बिरारी यांनी केले.