नंदुरबार l प्रतिनिधी
मानवी देह नश्वर आहे मृत्यूनंतर देह जाळू किंवा दफन करू नका. दान करण्याची वृत्तीभावना असावी मरण प्रत्येकाला येणार आहे. चंदनासारखा देह झिजवा. मृत्यूनंतरही कोणासाठी तरी या देहाचा उपयोग व्हावा म्हणून अवयवदान आणि देहदानासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. अन्नदान, कन्यादान, नेत्रदान, रक्तदान, त्वचादान, विद्यादान आणि देहदान ही सप्तपदी अवलंबवावी असे प्रतिपादन पुरुषोत्तम पवार यांनी व्यक्त केले.
खान्देश अवयवदान जनप्रबोधन रथयात्रा बुधवारी नंदुरबारात दाखल झाली. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत दिवसभर विविध ठिकाणी प्रबोधन कार्य सुरू होते. बुधवारी सकाळी सर्वप्रथम योग विद्याधाम येथील सभागृहात चर्चासत्र झाले. त्यानंतर मार्केट कमिटी, श्रॉफ कनिष्ठ महाविद्यालय, जी टी पी महाविद्यालय, विधी महाविद्यालय, वैद्यकीय महाविद्यालय, नर्सिंग महाविद्यालय, ज्येष्ठ नागरिक संघ, बंधारपाडा गावात
आदी ठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. जीटी पाटील महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित चर्चासत्रात प्राचार्य डॉ. महेंद्र रघुवंशी अध्यक्षस्थानी होते.
तर संस्थेचे समन्वयक डॉ. एम. एस. रघुवंशी,उपस्थित होते. याप्रसंगी पुढे बोलताना पुरुषोत्तम पवार म्हणाले की, कुटुंबातील व्यक्तीचे पंचप्राण निघून गेले तरी शरीर उरते. विज्ञानाने प्रगती केली मात्र अजूनही जुन्या चालीरीती रुढी परंपरांना धरून मानवी आयुष्य खुंटले आहे. म्हणून मृत्यूनंतर देह जाळू नका, दफन करू नका. दान करण्याची वृत्ती, भावना असावी. या प्रबोधन रथयात्रे सोबत मुंबई येथून सुधीर बागायतकर, माधुरी बागायतकर, प्रशांत बागणे, सुनील देशपांडे, नागराज अय्यर,अविनाश कुलकर्णी, अशोक जवेरी, चंद्रशेखर देशपांडे,याप्रमाणे निवृत्त अधिकाऱ्यांची टीम आहे.जीटीपी महाविद्यालयात उपेंद्र धगधगे यांनी सूत्रसंचालन केले.
खान्देश अवयवदान जनप्रबोधन रथयात्रा अभियान यशस्वीतेसाठी नंदुरबार जिल्हा सार्वजनिक समितीचे अध्यक्ष डॉ. शिवाजीराव पाटील, उपाध्यक्ष सुरेश जैन, सचिव डॉ.अर्जुन लालचंदानी,समन्वयक महादू हिरणवाळे, सदस्य श्रीराम दाऊतखाने, डॉ. वडाळकर, यांनी संयोजन केले.