म्हसावद । प्रतिनिधी:
म्हसावद,ता.शहादा येथे पाच सहा दिवसात शंभरच्यावर डुक्करांचा साथीच्या आजारामुळे मृत्यू झालेला असून डुक्करांचे मृत्यूसत्र सुरूच आहे. ग्रामपंचायत मार्फत कन्हेरी नदीत गावाच्या चौफेर मेलेली डुकरे जेसीबी मशिनच्या सहाय्याने खड्ड्यात पुरून टाकण्याचे काम दोन दिवसापासून सुरूच आहे.
दरम्यान बुधवारी सकाळी सहाय्यक आयुक्त जिल्हापशु सर्व चिकीत्सक विभागाची टीम म्हसावदला दाखल होवून पाहणी सुरू आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की,गेल्या पाच सहा दिवसात म्हसावद गावात असलेल्या शंभरच्यावर डूक्करांचा मृत्यू झाला असून मृत्यूसत्र सुरूच आहे. ग्रामपंचायतचे ग्रामविकासअधिकारी बी.पी.गिरासे दोन दिवसापासून तळ ठोकून आहेत. जे.सी.बी.च्या सहाय्याने मृत डुक्करे खड्ड्यात पुरण्याचे काम सुरूच आहे.
सद्यस्थितीत म्हसावद गावाची श्री रिद्धी सिद्धी विनायक यात्रा पुर्णतः कन्हेरी नाल्यालगत भरत असल्याने या भागातही मोठ्या प्रमाणात सर्वत्र दुर्गंधी पसरल्याने यात्रेतील हॉटेल्स,दुकाने येण्याची शक्यता कमी आहे. दरम्यान आज सकाळी नंदुरबार येथून सहाय्यक आयुक्त जिल्हा पशु सर्व चिकीत्सक विभाग डाॅ.एस.डी.कुलकर्णी यांचेसह डाॅ.डी.एस.गावीत(तळोदा),डाॅ.एम.जी.अहिरे, डाॅ.मोहन कुंभार यांनी आजारी जीवंत डुकराचे व आजाराने मृत झालेल्या डुकराचे शवविच्छेदन केले. शवविच्छेदन करून डूकराचे ठरावीक अवयव पुणे येथे पाठविण्यात येणार आहे.पुण्याहून अहवाल प्राप्त झाल्यावरच आजाराचे खरे कारण समजणार आहे.