नंदुरबार l प्रतिनिधी
सध्या नंदुरबार जिल्ह्यात विविध कारणांसाठी रुग्णांना रक्ताची अत्यावश्यक गरज आहे. पुरवठ्यापेक्षा मागणीचे प्रमाण जास्त असल्याने रक्ताचा तुटवडा भासत आहे. यास्तव इच्छुक रक्तदाते आणि स्वयंसेवी संस्था तसेच शासकीय कर्मचाऱ्यांनी देखील उत्स्फूर्तपणे रक्तदानासाठी सहभागी होण्याचे आवाहन नंदुरबार जिल्हा रुग्णालयाचे प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नरेश एम. पाडवी यांनी केले आहे.
यासंदर्भात प्रसिद्ध दिलेल्या पत्रकात प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नरेश एम.पाडवी यांनी म्हटले आहे की, नंदुरबार जिल्ह्यात सिकलसेलचे प्रमाण वाढले आहे.याशिवाय जिल्हाभरातून दाखल होणाऱ्या गर्भवती मातांना प्रसूतीनंतर रक्ताची गरज भासते. याच बरोबर रस्ते अपघातांचे प्रमाण वाढले आहे. अपघातग्रस्त रुग्णास देखील तातडीने रक्तपुरवठा करणे आवश्यक असते.नंदुरबार जिल्हा रुग्णालयात सुसज्ज रक्तपेढी असून या ठिकाणी प्रक्रिया करून रक्त उपलब्ध करून देण्यात येते.
विविध समारंभ वाढदिवस आनंद उत्सव प्रसंगी रक्तदान शिबिराचे आयोजन करून सेवाभावी व सामाजिक संस्था हातभार लावू शकतात. किंवा वैयक्तिक स्वरूपात थेट जिल्हा रुग्णालयातील रक्त संकलन केंद्रात जाऊन रक्तदान करण्याची संधी आहे.नंदुरबार जिल्ह्यात सध्या रक्ताचा तुटवडा मोठ्या प्रमाणावर आहे.ही परिस्थिती लक्षात घेता विविध सामाजिक संस्था,शासकीय कर्मचारी आणि इच्छुक रक्तदात्यांनी रक्तदानासाठी उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याचे आवाहन नंदुरबार जिल्हा रुग्णालयाचे प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नरेश एम. पाडवी यांनी केले आहे.