नंदुरबार l प्रतिनिधी
भारतीय हवामान विभाग, प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांचेकडून प्राप्त हवामान अंदाजानुसार जिल्ह्यात २५ ते २७ नोव्हेंबर दरम्यान पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
हवामानात बदल होत असून वादळी वाऱ्यासह (३० ते ४० किमी/तास) हलक्या व मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच २६ आणि २७ तारखेला नाशिक, धुळे, नंदुरबार जिल्हयात पाऊस होईल. तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची संभावना आहे. दरम्यान तापमानात देखील घट होणार आहे. कमाल तापमान ३१ ते ३२ अंश आणि किमान तापमान १५ ते १७ अंश सेल्सिअस राहील.
पावसाची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी लवकरात लवकर कापूस पिकाची वेचणी करुन सुरक्षीत ठिकाणी ठेवावे. पथारींवरील मिरच्या गोळा करून झाकून ठेवण्याची व्यवस्था करावी. बाजार समितीतील धान्य सुरक्षित ठिकाणी ठेवावे. तसेच पावसाची शक्यता असल्याने पिकांना पाण्याची पाळी देणे टाळावे, पक्वता अवस्थेत असलेल्या पिकांची काढणी करून सुरक्षित ठिकाणी ठेवावे, वादळी वाऱ्याची शक्यता असल्याने फळ पिकांना आधार देण्याची व्यवस्था करावी, असे आवाहन डॉ. हेडगेवार सेवा समितीचे कृषी विज्ञान केंद्र कोळदा येथील जिल्हा कृषी हवामान केंद्राने केले आहे.








