नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार तालुक्यातील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता तातडीच्या उपाय योजना करणे चालू आहे. त्याचाच एक भाग म्हणून तापी – बुराई योजनेसाठी सातत्याने पाठपुरावा करणे चालू असून त्याला यश आले आहे. त्या कामाला आवश्यक असलेली शासकीय मान्यता येत्या पंधरा दिवसात प्राप्त होईल; अशी माहिती आदिवासी विकास मंत्री नामदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी दिली.
यावर्षी संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यात पर्जन्यमानाचे प्रमाण अत्यंत कमी राहिले. नंदुरबार तालुक्यात देखील सरासरीपेक्षा कमी प्रमाणात पाऊस झाला. नदी नाल्यांना पूर न आल्यामुळे धरणांमध्ये पुरेसा जलसाठा झालेला नाही तसेच तलाव आणि बंधारे यातही पाणी साठलेले नाही. परिणामी अद्याप हिवाळा चालू असतानाच येत्या उन्हाळ्यात अनेक गावांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागेल असे दिसत आहे. नंदुरबार तालुक्यातील शेतीच्या पाण्याचा त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनण्याची चिन्हे दिसत आहेत. त्या सर्व पार्श्वभूमीवर प्रलंबित तापी-बुराई योजना तातडीने पूर्णत्वास येणे आवश्यक बनले आहे.
या संदर्भाने माहिती देताना आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी सांगितले की, येत्या उन्हाळ्यात अनेक गावांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागेल असे दिसत आहे. नंदुरबार तालुक्यातील शेतीच्या पाण्याचा त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनण्याची चिन्हे दिसत आहेत. ते सर्व लक्षात घेऊन राज्य सरकारकडे मी सातत्याने पाठपुरावा चालवला असून तातडीच्या काही उपाय योजना केल्या जाव्या असे सुचविले आहे.
दरम्यान, महाराष्ट्र राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन यावर चर्चा केली होती. प्रलंबित तापी बुराई योजनेचा उर्वरित टप्पा पूर्ण केला जावा, अशी आग्रहाची मागणीही मांडली होती. त्याला आता यश मिळाले असून येत्या पंधरा दिवसात तापी बुराई योजनेला आवश्यक असलेल्या सर्व प्रशासकीय मान्यता प्राप्त होतील आणि पुढील चार महिन्यात तापी बुराई योजनेचे काम पूर्णत्वास येऊन पाणीटंचाईचा प्रश्न सुटण्याचा मार्ग मोकळा होईल, अशी माहिती आदिवासी विकास मंत्री नामदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी दिली.








