शहादा l प्रतिनिधी
दि.26 नोव्हेंबर 2023 रविवारी शहादा येथे संविधान दिवसाच्या निमित्ताने संविधान गौरव भव्य दिव्य प्रमाणात साजरा होणार आहे.संविधान दिनानिमित्त रॅली काढण्यात येणार असून त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात प्रबोधनात्मक जनजागृती कार्यक्रम संपन्न होणार आहे.
याबाबत अधिक माहिती अशी,शहादा येथे विविध सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक संघटना, संविधानावर विश्वास ठेवून आपले जीवन अग्रक्रमित करणारे लोक व विविध विचारधारांवर कार्य करणाऱ्या संस्था मिळून गेल्या बारा वर्षांपासून संविधानाच्या गौरवाचा कार्यक्रम घेत आहेत.येथील कार्यक्रमाची दखल घेऊन संपूर्ण महाराष्ट्रात संविधान दिवस संपूर्ण शासकीय कार्यालयात साजरा केला जाऊ लागला आहे. हे शहादा ह्या चळवळीच्या शहराचे ऐतिहासिक महत्त्व राहिले आहे.
याच धर्तीवर पुढील काळात संविधान निर्मात्यांनी जे संविधान तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद, तत्कालीन प्रधानमंत्री पंडित नेहरू व लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या हातात जी मुळ प्रत बहाल केली होती.ती प्रत प्रत्येक भारतीयाने आजच आपापल्या घरात जतन करुन ठेवली पाहिजे. हा स्वच्छ हेतू ठेवून ह्या कार्यक्रमाचे आयोजन दरवर्षी दि.26 नोव्हेंबर या दिवशी केले जाते.सालाबादप्रमाणे यंदाही भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
त्याअंतर्गत दि.26 रोजी सकाळी ठिक 9:30 वाजता संविधान चौक शहादा येथून रॅली काढण्यात येणार आहे.रॅलीचे मुख्य आकर्षण म्हणजे या रॅलीत संविधान पालखी काढण्यात येणार आहे.मुळ संविधानाची प्रत या पालखीत ठेवून “आम्ही भारताचे लोक” या संविधानाच्या पालखीचा भार उचलणार आहेत.पालखी सजवणे व संविधान चौकातील सर्व व्यवस्था पंचशिल परिसरातील संविधान प्रेमीनी घेतली आहे.या रॅलीत नंदुरबार जिल्ह्यातील अनेक खेड्यापाड्यातील लोक सहभागी होणार आहेत. तेथून रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकावर पुष्प उधळले जातील व रॅली राष्ट्रमाता सावित्रीमाई व राष्ट्रपिता महात्मा फुले यांच्या स्मारकावर त्यांच्या पायात पुष्प अर्पण करतील.पुढे युगप्रवर्तक महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केल्यानंतर गुजर गल्ली कुकडेल परिसरातील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मनोरंजन सिनेमा हाॅलजवळील संविधान स्तंभाचे मान्यवरांचे हस्ते पूजन होईल.
त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा स्मारक स्थळ येथे संविधान निर्मात्यांना पुष्पहार अर्पण करून ठीक अकरा वाजता रॅलीचे सभेत रुपांतर होणार आहे.या कार्यक्रमास जेष्ठ सामाजिक विचारवंत व संविधानाच्या गाढ्या अभ्यासिका उल्का महाजन ह्या रायगडहून उपस्थित राहून उपस्थित कार्यकर्त्यांना “देशाची आजची स्थिती व संविधानाने घालून दिलेल्या हक्क अधिकारांची वास्तव स्थिती” या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.जिल्ह्यातील संविधान प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन शहाद्यातील सर्व जाती धर्माच्या संविधान प्रेमींनी केले आहे अशी माहिती आयोजन समितीच्या वतीने देण्यात आली आहे.








