नंदुरबार l प्रतिनिधी
दिवाळी हंगामात राज्य परिवहन महामंडळाने प्रवास भाड्यात दहा टक्के वाढ करून देखील सध्या मोठ्या प्रमाणावर एसटीतून गर्दी दिसत आहे. रविवारी मात्र धुळे ते नंदुरबार शिवशाहीचा प्रवास तब्बल चार तासांचा झाला.
वाढीव प्रवास भाडे देऊन देखील वातानुकलीत असलेली शिवशाही शोभेची ठरली. याबद्दल प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली.रविवारी भागवत भूषण विश्वविख्यात प्रवचनकार पंडित प्रदीप मिश्रा यांची धुळे येथील शिव महापुराण कथा समाप्तीनंतर प्रवाशांची तोबा गर्दी वाढली. रविवारी दुपारी एक वाजता नंदुरबार आगाराची शिवशाही बस (एम. एच.-43 एफ. एम. 6809) धुळ्याहून नंदुरबारसाठी मार्गस्थ झाली. प्रवाशांना यावेळी दुरून डोंगर साजरे या म्हणीचा प्रत्यय आला.
वातानुकूलित आणि चकचकीत दिसणारी शिवशाही बसने प्रवाशांना घामाघुम केले.आधीच नादुरुस्त असलेल्या वातानुकूलित यंत्रणेमुळे प्रत्येक सीटवर पाण्याची टीप टीप गळती लागली होती. वातानुकूलित शिवशाही बस मधून गारव्याचा लाभ मिळू न शकल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली. दुपारी एक वाजेला धुळे बसस्थानकावरून निघालेली शिवशाही बस नंदुरबारला पाच वाजता पोहोचली.जलद गाडी असताना चिमठाणे, दोंडाईचे, रनाळे, वावद या ठिकाणी थांबे घेऊन प्रवाशांना सोडण्यात आले.यामुळेच वातानुकूलित शिवशाही बसला धुळे ते नंदुरबार चार तासांचा अवधी लागला.
महाराष्ट्र पेक्षा गुजरात चांगले
राज्य परिवहन महामंडळाच्या याच वातानुकूलित शिवशाही बसमधून प्रवास करणाऱ्या गुजरात राज्यातील प्रवाशांनी अनुभव घेत “आपणू गुजरात सारू छे…” असा शेरा मारला.
याबाबत नंदुरबार आगारप्रमुख संदीप निकम यांनी सांगितले की, दिवाळी हंगाम आणि धुळे येथील शिवमहापुराण कथा यामुळे प्रवाशांचा वाढलेला लोड पूर्ण करीत असताना धुळे विभागाला कसरत करावी लागली. मात्र वाहक चालकांसह कर्मचाऱ्यांची मेहनत वाढिव उत्पन्नासाठी तितकीच महत्त्वाची ठरली आहे.