नंदुरबार l प्रतिनिधी
जनजाती गौरव दिन सोहळ्याच्या तिसऱ्या दिवशी देखील एकाहून एक सरस सादरीकरण आदिवासी नृत्य पथकांनी केले. त्यानंतर उत्तम सादरीकरण करणाऱ्या पथकांना पुरस्कार घोषित होताच सर्व पथकांनी दणकेबाज संगीतावर एकत्रित नृत्य करून एकच जल्लोष केला. त्यांच्या समवेत टी आर टी आय च्या आणि आदिवासी विकास प्रकल्पाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सुद्धा ठेका धरून पथकांचा आनंद द्विगुणित केला. दरम्यान याप्रसंगी केलेल्या प्रमुख भाषणात संसदरत्न खासदार डॉ.हिना गावित यांनी विकसित भारत संकल्प यात्रा 10 दिवस चालणार असल्याची माहिती दिली व शेवटच्या गरजूपर्यंत केंद्राच्या योजना पोहोचवाव्या, असे आवाहन केले.

17 नोव्हेंबर 2023 रोजी मागील तीन दिवसापासून चालू असलेल्या जनजाती गौरव दिन सोहळ्याची अत्यंत जल्लोषात सांगता झाली. समारोपाच्या या कार्यक्रमात जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ.सुप्रिया गावित, संसदरत्न डॉ.हिना गावित, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ.कुमुदिनी गावित यांच्या हस्ते व आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था संचालिका चंचल पाटील, उपसंचालक हेमध्वज सोनवणे, अनु. जात पडताळणी कार्यालयाचे सह आयुक्त सरोदे, गणेश तिडके, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी चंद्रकांत जी पवार, सहाय्यक प्रकल्प अधिकारी डगळे व अन्य मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत उत्तम सादरीकरण करणाऱ्या नृत्य पथकांना पुरस्कार वितरित करण्यात आले.
पुरस्कार प्राप्त पथक याप्रमाणे:
प्रथम पुरस्कार पारंपारिक आदिवासी ढेमसा नृत्य लोहारा, झरीझामणी, जिल्हा यवतमाळ
द्वितीय पुरस्कार वीर बाबूराव शेडमाके
घुसाडी डेमसा नृत्य, पांढरकवडा जिल्हा यवतमाळ
तृतीय पुरस्कार बिरसा मुंडा नृत्य पथक, अहेरी, जिल्हा गडचिरोली, रेला नृत्य
उत्तेजनार्थ पुरस्कार तारपा नृत्य धानिवारी, ता. डहाणू जिल्हा पालघर आणि वरसूबाई ढोलताशा गोफ नृत्य, जुन्नर, जिल्हा पुणे
तत्पूर्वी प्रमुख पाहुण्यांचे बिरसा मुंडा प्रतिमा देऊन स्वागत करण्यात आले.
संसदरत्न खासदार डॉ हिनाताई गावित प्रमुख भाषणात म्हणाल्या की, भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त देशभरातील जनजातींचा गौरव केला जावा म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात जनजाती गौरव दिन साजरा करण्याला सुरुवात केली. यंदा या सोहळ्याचा बहुमान आदिवासी बहुल नंदुरबार जिल्ह्याला मिळाला ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. इतक्या देखण्या भव्य सोहळ्याचे आयोजन आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था व महाराष्ट्राच्या आदिवासी विकास विभागाने केले आणि त्या माध्यमातून महाराष्ट्रभरातील आदिवासी कलाकारांना प्रोत्साहन दिले एका व्यासपीठावर येण्याची संधी दिली म्हणून आदिवासी विकास मंत्री नामदार डॉक्टर विजयकुमार गावित यांचे आभार मानते.
या ठिकाणी 127 स्टाल लागले विविध महिला बचत गटांनी आणि हस्तकला शिवणकला भरतकाम शिल्पकला तसेच खाद्यपदार्थ व औषधी विक्रेत्यांनी त्यांच्याकडील साहित्य सादर केले. बांबू पासून आपणही विविध वस्तू बनवू शकतो विविध वनस्पतींपासून उपयुक्त द्रव्य बनवू शकतो याची माहिती महिलांना मिळाल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढला.11 लघुपट गेल्या तीन दिवसात प्रदर्शित झाले त्यामुळे उपस्थितितांना आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडले. ही या गौरव दिनाची निष्पत्ती आहेआहे; असे सांगून खासदार डॉक्टर हिना गावित यांनी विकसित भारत संकल्प यात्रा 10 दिवस चालणार असल्याची माहिती दिली व शेवटच्या गरजूपर्यंत केंद्राच्या योजना पोहोचवाव्या, असे आवाहन केले.
जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित यांनी देखील उत्तम आणि चांगले आयोजन केल्याबद्दल आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, महाराष्ट्र आदिवासी विकास विभाग आणि एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयाच्या समस्त अधिकाऱ्यांचे कौतुक केले. त्याआधी स्टॉल धारकांची भेट घेऊन डॉक्टर सुप्रिया गावित यांनी माहिती घेतली. खासदार डॉक्टर हिना गावित यांनीही स्टॉलवर जाऊन संवाद साधला. टी आर टी आय च्या संचालिका चंचल पाटील यांनी शेवटी सर्व उपस्थितांचे आभार मानले.








