नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्ह्यात शांतता अबाधित ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांनी मनाई आदेश जारी केले आहेत.
राज्यातील सध्याचे राजकीय व सामाजिक वातावरण बघता जिल्ह्यात विविध संघटनांतर्फे धरणे, मोर्चे, बंद इत्यादी आंदोलने होण्याची शक्यता आहे. तसेच वैयक्तिक व सामूहिकरीत्या आमरण, लाक्षणिक उपोषण करण्यात येतात. या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांच्या आदेशाने १६ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत हे प्रतिबंधात्मक आदेश काढण्यात आले आहेत.
यानुसार सोटे, तलवारी, बंदुका, भाले, सुरे, लाठ्या, हत्यारे घेऊन फिरता येणार नाही, अंग भाजणारा दाहक पदार्थ, स्फोटक पदार्थ, द्रव्ये यावरही निर्बंध घालण्यात आलेले आहे. सार्वजनिक शांतता धोक्यात येईल असे भाषण करणे, हावभाव करणे अथवा सोंग आणणे, जाहीरपणे घोषण देणे, गाणी म्हणणे, वाद्य वाजविणे तसेच कोणत्याही व्यक्तीची आकृती किंवा प्रतिमेचे प्रदर्शन करणे अगर दहन केल्यास आदेशांचे उल्लंघन होणार आहे. मनाई हुकूमान्वये पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकाऱ्यांच्या पूर्वपरवानगीने मिरवणूक काढता येणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे.








