नंदुरबार l प्रतिनिधी
महाराष्ट्राचा प्रमुख जनजाती गौरव दिन सोहळ्याचा शुभारंभ महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस आणि मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या हस्ते केला जाणार असून राज्यभरातील 800 हून अधिक कलापथक येथे तीन दिवस चालणाऱ्या सांस्कृतिक सोहळ्यात सहभागी होणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑन स्क्रीन जनजाती गौरव दिना चे उद्घाटन केले जाईल; तरी समस्त आदिवासी बांधवांनी तसेच नागरिकांनी या सोहळ्याला उपस्थित राहावे असे आवाहन आदिवासी विकास मंत्री नामदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी आज पत्रकार परिषदेत केले.
याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय प्रवक्त्या तथा खासदार डॉक्टर हिना गावित, जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित आणि भारतीय जनता पार्टीचे डॉक्टर विक्रांत मोरे उपस्थित होते. या पत्रकार परिषदेत माहिती देताना आदिवासी विकास मंत्री नामदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी सांगितले की, भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त देशातील मोदी सरकारने जनजाती गौरव दिन साजरा करण्याला सुरुवात केली. 15 नोव्हेंबर 2023 रोजी देशभरात ही जयंती साजरी केली जात असून जनजाती गौरव दिनाचे आयोजन सर्वत्र केले जात आहे.
नंदुरबार हा महाराष्ट्रातील एकमेव आदिवासी जिल्हा असल्याने महाराष्ट्र राज्याचा प्रमुख जनजाती गौरव दिन सोहळा नंदुरबार येथे खामगाव रस्त्यावरील जिल्हा क्रीडा संकुल मैदानावर 15 नोव्हेंबर 2023 रोजी आयोजित करण्यात आलेला आहे. सलग तीन दिवस हा सोहळा चालणार असून त्यात महाराष्ट्र भरातील आदिवासी संस्कृतीचे प्रदर्शन यानिमित्त घडणार आहे. महाराष्ट्राच्या विविध भागातून 800 हून अधिक कलाकारांचा सहभाग असलेले 32 कलापथक या ठिकाणी येतील. तीन दिवस चालणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमात ते आपल्या कला व संस्कृतीचे सादरीकरण करतील. विविध गावपाड्यातील आदिवासी बंधू लाकडापासून आणि वनस्पतींपासून विविध प्रकारच्या वस्तू बनवतात त्या हस्तकलेचे प्रदर्शन सुमारे 200 स्टॉल मधून केले जाणार आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस आणि मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या हस्ते पंधरा नोव्हेंबर 2023 रोजी या सोहळ्याचा शुभारंभ होणार असून पंधरा हजाराहून अधिक नागरी उपस्थित राहतील; असे मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित म्हणाले.
दरम्यान, महाराष्ट्राचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांचे अधिकृत दौरे जाहीर झाले असून कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू आहे. राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्या जाहीर झालेल्या दौऱ्यानुसार मुंबई येथून एकाच हेलिकॉप्टरने त्यांचे नंदुरबार येथे दहा वाजून 40 मिनिटांनी आगमन होईल. हेलिपॅड वरून जिल्हा क्रीडा संकुल मैदानावर येतील. कार्यक्रम स्थळी प्रारंभी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणाऱ्या उद्घाटनाची चित्रफीत दाखवली जाईल. त्यानंतर राज्यपाल बैस आणि मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे हे नंदुरबार येथील जनजाती गौरव दिनाचा शुभारंभ करतील. त्यानंतर छोटा लघुपट प्रदर्शित केला जाईल. प्रमुख भाषणानंतर सांस्कृतिक कार्यक्रम रात्री उशिरापर्यंत केले जातील.








