नंदुरबार l प्रतिनिधी
बुधवार दि.15 ते 19 नोव्हेंबर दरम्यान धुळे येथे भागवत भूषण पंडित प्रदीप मिश्रा महाराज यांचे शिवमहापुराण कथा प्रारंभ होत आहे. नंदुरबार आगारातर्फे धुळे येथे भाविकांना जाण्यासाठी जादा एसटी बसेस सोडण्याची मागणी ग्राहकतीर्थ बिंदूमाधव जोशी प्रणित महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघाचे तालुका अध्यक्ष महादू हिरणवाळे आणि पदाधिकाऱ्यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे.

महाराष्ट्र प्रवासी महासंघ नंदुरबार तालुकातर्फे धुळे विभागीय नियंत्रक विजय गीते आणि नंदुरबार आगारप्रमुख संदीप निकम यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मध्यप्रदेश राज्यातील सिहोर येथील भागवत भूषण विश्वविख्यात कथाकार पंडित प्रदीपजी मिश्रा यांच्या वाणीद्वारे शिव महापुराण कथेचे धुळे नगरीत आयोजन करण्यात आले आहे.दि. 15 ते 19 नोव्हेंबर दरम्यान दररोज सकाळी धुळे येथे जाण्यासाठी आणि कथा संपल्यानंतर परतीच्या मार्गासाठी धुळ्याहून नंदुरबारसाठी ज्यादा बसेस सोडण्यात यावे.नंदुरबार आगारातून सकाळी सहा वाजेपासून सायंकाळी सात वाजेपर्यंत नंदुरबार- धुळे वाढीव फेऱ्यांचे नियोजन करण्यात यावे. कथा श्रवणानंतर अनेक भाविकांना नंदुरबारच्या परतीसाठी राज्य परिवहन महामंडळाने सुविधा करून द्यावी.
याचबरोबर सुस्थितीतील एसटी बसेस देण्याची काळजी घ्यावी.शक्य झाल्यास नंदुरबार बसस्थानकावरून थेट धुळे येथील हिरे मेडिकल जिल्हा रुग्णालय शेजारील कथा मंडपापर्यंत भाविकांसाठी एसटी बसेस उपलब्ध करून द्यावी. अशीही मागणी महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघाच्या नंदुरबार तालुकातर्फे करण्यात आली आहे.या निवेदनावर प्रवासी महासंघाचे नंदुरबार तालुकाध्यक्ष महादू हिरणवाळे, उपाध्यक्ष डॉ.गणेश ढोले, संघटक योगेश्वर जळगावकर, ज्येष्ठ सदस्य बी. डी. गोसावी, वैभव करवंदकर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
निवेदन स्वीकारल्यानंतर आगार प्रमुख संदीप निकम यांनी सकारात्मक प्रतिसाद देत दिवाळी हंगाम असला तरी धुळे येथील शिवमहापुराण कथेसाठी प्रवासी भाविकांची संख्या लक्षात घेता जादा बसेस सोडण्याची नियोजन करण्यात येत असल्याचेआश्वासित केले.








