नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार शहरातील अमृत चौकात किरकोळ कारणावरुन चाकूने भोसकून तरुणाचा खून केल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली असून याप्रकरणी तीन संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, (दि.१३) रविवारी मध्यरात्री २ ते ३ वाजेच्या सुमारास विजय विश्वनाथ चौधरी (रा.कोकणीहिल, नंदुरबार) याच्या सांगण्यावरुन आकाश उर्फ दादा चौधरी, विक्की हिंगडी (दोन्ही रा.नंदुरबार) यांनी योगेश्वर जगन्नाथ चौधरी यास शहरातील अमृत चौक परिसरात आणले.

यावेळी आकाश चौधरी व विक्की हिंगडी यांनी योगेश्वर हा विजय चौधरीसोबत दारु पितो पण भांडणात त्याची बाजू घेत नाही. या कारणावरुन वाद घातला. आकाश व विक्कीने योेगेश्वर चौधरी यास लाथाबुक्यांनी पोट, पाठीवर मारहाण करुन शिवीगाळ केली.
सदर भांडण सोडवत असतांना प्रशांत चौधरी व ऋषी चौधरी यांना देखील मारहाण करण्यात आली. आकाश उर्फ दादा याने त्याच्या जवळील चाकू काढून योगेश्वर चौधरी याच्या डाव्या पायावर वार करुन गंभीर जखमी करुन जिवेठार केले. याप्रकरणी मृत योगेश चौधरी याचा मावसभाऊ गणेश सुनिल चौधरी रा.भाटगल्ली, नंदुरबार याच्या फिर्यादीवरुन शहर पोलिस ठाण्यात तिघा संशयितांविरोधात भादंवि कलम ३०२, ११४, ३२३, ५०४, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.








