शहादा l प्रतिनिधी
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव आणि पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने नंदुरबार जिल्हास्तरीय “आविष्कार 2023” च्या पहिला टप्प्याचे आयोजन पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय शहादा येथे दि.18ऑक्टोबर 2023 गुरुवार रोजी उत्साहात संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष बापूसाहेब दीपकभाई पाटील होते.
उद्घाटन समारंभ शहादा उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ताजी पवार, समन्वयक प्रा. मकरंद पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मयूरभाई दीपक पाटील, विद्यापीठाचे आविष्कारचे पर्यवेक्षक डॉ. उज्वल पाटील, मंडळाच्या विविध ज्ञानशाखांचे प्राचार्य व विद्यापीठातून नेमणूक केलेले तज्ञ आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थित पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या सर विश्वेश्वरैय्या सभागृहात संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात सर्वप्रथम माता सरस्वती, स्व. अण्णासाहेब पी.के.पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष दीपकभाई पाटील यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की, विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक गुणवत्ता वाढावी.त्यांच्यातील कौशल्य विकसित होऊन भविष्यात त्याचा फायदा नक्कीच होईल. भविष्यात विद्यार्थ्यांना वैज्ञानिक दृष्टीकोनातून नवनवीन शोधासाठी संशोधन करण्यास हा उपक्रम उपयुक्त ठरेल. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आविष्कार च्या माध्यमातून संशोधनासाठी चांगली संधी उपलब्ध झाली असून विद्यार्थ्यांनी परिसराचा नावलौकिक करावा असे सांगितले तसेच स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी उपस्थित मान्यवर व पर्यवेक्षक यांनी मार्गदर्शन केले. त्यांनतर संस्थेतील सरदार वल्लभभाई पटेल सभागृहात पोस्टर प्रदर्शन सादरीकरण, मॉडेल्स (उपकरण) चे फित कापून स्पर्धेची सुरुवात करण्यात आली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष दीपकभाई पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ताजी पवार, समन्वयक प्रा. मकरंद पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मयूरभाई दीपक पाटील व उपस्थित मान्यवरांनी आविष्कार 2023 मध्ये सहभागी स्पर्धकांकडून त्यांच्या घटकावर व विषयावर आधारित माहिती जाणून घेतली.आविष्कारमध्ये एकूण चार गट होते त्यात पदवी, पदव्युत्तर पदवी व एम.फील, पीएचडी संशोधक, कुलगुरू संशोधन प्रेरणा योजना (वीसीआरएमएस) तसेच विभागनिहाय एकूण सहा विभाग होते. नंदुरबार जिल्ह्यातून वैयक्तिक व समूह मिळून एकूण 459 विद्यार्थीनी सहभाग नोंदवला.
यामध्ये एकूण सहा विभाग होते. त्यात भाषा, कला, समाजविज्ञान व मानसनिती विभागामध्ये पोस्टर प्रदर्शन सादरीकरण एकूण 52, विज्ञान विभागामध्ये मॉडेल्स (उपकरण) 06 तसेच पोस्टर प्रदर्शन सादरीकरण 68 असे एकूण 74, वाणिज्य, व्यवस्थापन आणि विधी विभागामध्ये पोस्टर प्रदर्शन सादरीकरण एकूण 08, औषधनिर्माणशास्त्र विभागामध्ये मॉडेल्स (उपकरण) 07 तसेच पोस्टर प्रदर्शन सादरीकरण 82 असे एकूण 89, कृषी व पशुसंवर्धन विभागामध्ये मॉडेल्स (उपकरण) 03 तसेच पोस्टर प्रदर्शन सादरीकरण 26 असे एकूण 29, अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान विभागामध्ये मॉडेल्स (उपकरण) 03 तसेच पोस्टर प्रदर्शन सादरीकरण 10 असे एकूण 13 विषय, विभाग व घटकानुसार वैयक्तिक व समूह मिळून एकूण 459 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. यापैकी 19 मॉडेल्स (उपकरण) असून त्यांचे प्रात्यक्षिक करून दाखवले तर 246 पोस्टर सादरीकरण प्रदर्शन करून त्यावर माहिती देण्यात आली.
मॉडेल्स (उपकरणाच्या) प्रात्यक्षिकासाठी टेबल, विद्युत व पाणी अशी सर्व प्रकाराची सोई सुविधा, सुसज्ज करण्यात आली होती. तसेच विविध विभागातून सहभाग नोंदवलेल्या विद्यार्थ्यांनी पोस्टर सादरीकरण प्रदर्शन करून उपस्थित पर्यवेक्षक, तज्ञ व सर्वांना माहीती दिली. आविष्कार 2023 मध्ये नंदुरबार जिल्ह्यातील शहादा, तळोदा, नंदुरबार, अक्कलकुवा, धडगाव, नवापूर तालुक्यातील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला व उत्सुर्फ प्रतिसाद मिळाला.
आविष्कार चा निकाल हा विद्यापीठाच्या संकेत स्थळावर जाहिर करण्यात येणार आहे. सदर कार्यक्रमासाठी पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष दीपकभाई पाटील, उपाध्यक्ष जगदीश पाटील, मानद सचिव श्रीमती कमलताई पाटील, शैक्षणिक व सामान्य प्रशासन विभागाचे समन्वयक प्रा. मकरंद पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मयूरभाई दीपक पाटील, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ विजय माहेश्वरी, प्र.कुलगुरू प्रा.एस.टी.इंगळे, रजिस्ट्रार डॉ विनोद पाटील, विद्यापीठातील समन्वयक प्रा.जयदीप साळी, सह-समन्वयक डॉ. जितेंद्र नारखेडे, डायरेक्टर विद्यार्थी विकास विभाग डॉ. जयेंद्र लेकुरवाळे यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ.एस.पी.पवार यांनी केले तर सूत्रसंचालन आविष्कार सहसमन्वयक प्रा. अमित धनकानी यांनी केले व आभार आविष्कार स्पर्धेच्या समन्वयक प्रा.डॉ सुनिला पाटील यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी महाविद्यालयाचे प्राध्यापक व कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले.