नंदुरबार l प्रतिनिधी

ब्रिटीशकालीन तांबेबारा धरण व दडचा तलावाचे पाणी पिण्यासाठी आरक्षित करावे, अशी मागणी तिलाली, तलवाडे व शनिमांडळ ग्रामस्थांतर्फे करण्यात आली आहे. तसे निवेदन आदिवासी विकास मंत्री ना.डॉ.विजयकुमार गावीत तसेच जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांना देण्यात आले आहे.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, नंदूरबार तालुक्यातील तिलाली, शनिमांडळ, तलवाडे खुर्द या तिन्ही गावाचा सार्वजनिक पाणी पुरवठ्याचे स्त्रोत हे ब्रिटीशकालीन तांबेबारा व दडचा तलाव आहे. परंतू या दोघा धरणावर शेतकर्यांनी अनधिकृत जलपरी ठेवून शेतीसाठी पाणी उपसा करीत आहेत. यामुळे या धरणातील पाणीसाठा संपुष्टात येत आहे. परिणामी वरील तिघी गावांना आतापासून पिण्याची पाण्याची टंचाई भासू लागली आहे.
भविष्यात तीव्र पाणी टंचाईला ग्रामस्थांना तोंड द्यावे लागू नये व त्यातून होणार्या भानगडी उद्भवू नये म्हणून या धरणाचा पाणीसाठा आरक्षित करावा असा ठराव देखील ग्रामपंचायतींनी केला आहे. आता प्रशासनाने सदर पाणीसाठा पिण्यासाठी आरक्षित करावा, अशी मागणी जि.प.सदस्या जागृती मोरे, माजी जि.प.सदस्य प्रविण पाटील, तिलाली सरपंच स्मिता पाटील, शनिमांडळ सरपंच संतोष पाटील, सदस्य जगन्नाथ पाटील, दीपक पाटील, संभाजी माळी, ताराबाई राजपूत, लाला भिल, योगेश मोरे, डॉ.भावराव पाटील, छायाबाई पवार, राजेंद्र माळी, ठाणसिंग राजपूत आदींनी केली आहे.









