नंदुरबार l प्रतिनिधी
दिव्यांग कल्याण विभागामार्फत दिव्यांगांच्या दारी अभियान राबविण्यात येत असून जिल्ह्यात 7 सप्टेंबर 2023 रोजी दिव्यांगांच्या दारी कार्यक्रम घेण्यात आला. या पार्श्वभुमीवर जिल्ह्यातील प्रत्येक विभागाने एक दिवस दिव्यांगांसाठी उपलब्ध करुन दिव्यांग बांधवांच्या समस्या, अडीअडचणी एकूण त्या सोडविण्यासाठी आज रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बिरसामुंडा सभागृहात जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांच्या उपस्थितीत सर्व संबंधित विभाग व दिव्यांग बांधवांची बैठक घेण्यात आली.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावन कुमार, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, परिविक्षाधिन सहाय्यक जिल्हाधिकारी अंजली शर्मा, समाज कल्याण आयुक्त सुंदरसिंग वसावे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद पवार, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अरुण हुमणे, महिला व बाल कल्याण कार्यक्रम अधिकारी कृष्णा राठोड, प्राथमिक शिक्षणाधिकारी सतीष चौधरी तसेच विविध विभागाचे संबंधित अधिकारी व दिव्यांग बांधव उपस्थित होते.
या बैठकीत जिल्ह्यातून आलेल्या प्रत्येक दिव्यांग बांधवांचे नांव, गांव, पत्ता, मोबाईल क्रमांक यांची माहिती घेवून त्यांना काय अडचण आहे, कोणते लाभ पाहिजे आदिबाबत माहिती घेण्यात आली.