नंदुरबार । प्रतिनिधी
रजाळे ता.नंदूरबार येथे गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे घराची भिंत पडून 10 सप्टेंबर पहाटे 4 वाजेच्या सुमारास घरातील कुटूंब दबले गेल्याची घटना घडली. यात १५ वर्षीय मुलगा जखमी झाला आहे व एक मुलगी किरकोळ जखमी झाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नंदूरबार तालुक्यातील रजाळे येथील शेतकरी राजेंद्र भटू मराठे यांच्या कुटुंबावर आज 10 सप्टेंबर रोजी पहाटे 4 च्या सुमारास त्यांच्या डोळ्यासमोरच थरार पहायला मिळाला. घरातील सर्वजण पहाटेच्या साखर झोपेत असताना अचानक भिंत पडून यामध्ये दबले गेले. राजेंद्र मराठे हे पहाटे पाणी भरायला उठले असता त्यांच्या लक्षात येताच त्यांनी आरडाओरड केली.

यावेळी आजूबाजूच्या रहिवाश्यांनी व युवकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत दबलेल्या सर्व जणांना सुखरूप बाहेर काढले. यामध्ये कुटुंबप्रमुख राजेंद्र मराठे यांचा मुलगा ओम राजेंद्र मराठे ( वय 15 ) याच्या अंगावर मोठ्या प्रमाणात भिंतीची माती व विटा पडल्याने त्याच्या डोक्याला मार लागला असून त्याचा हातही फॅक्चर झाला. तसेच मुलगी दीक्षा राजेंद्र मराठे हिला किरकोळ दुखापत झाली आहे तर आई द्वारकाबाई भटू मराठे, पत्नी रेखाबाई राजेंद्र मराठे हे पण दबले गेले होते. सदरची घटना भयावक होती.
काळ आला होता पण वेळ नव्हती त्यामुळे मराठे कुटुंबावर मोठे संकट टळले आहे. सदर घटनेमध्ये राजेंद्र मराठे यांच्या घरातील संसारोपयोगी साहित्याचे देखील नुकसान झाले आहे. दरम्यान या घटनेबाबत गावाचे तलाठी श्री शिंदे यांना दिली असता त्यांनीदेखील तात्काळ घटनास्थळी येऊन पंचनामा केला असून यामध्ये 26 हजार 500 रुपयांचे नुकसान झाल्याची नोंद करण्यात आली आहे. पंचनामा करतेवेळी लोकनियुक्त सरपंच राजू मराठे व ग्रामस्थ उपस्थित होते.








