नंदुरबार l प्रतिनिधी
येथील जिल्हा व सत्र न्यायालयात आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय लोक अदालतीत काल १ हजार ९६७ प्रकरणांचा निपटारा होऊन यातून ६ कोटी २९ लाख ६८ हजार १४० रुपयांची तडजोड करण्यात आली.यात १२ कुटूंबांमध्ये घडविला समेट घडविण्यात आला.
राष्ट्रीय लोक अदालतीसाठी जिल्ह्यातील सर्व न्यायालयातील तडजोडप्राप्त प्रलंबित, फौजदारी, दिवाणी, मोटार अपघात प्रकरणे, धनादेश अनादर झाल्याची प्रकरणे, कौटूंबिक वाद प्रकरणे व दाखलपूर्व प्रकरणांमध्ये वीज, पाणीपट्टी, घरपट्टी, सर्व बॅँका आदींच्या थकबाकीची प्रकरणे आपसात निकाली होण्यासाठी ठेवण्यात आली होती. लोक न्यायालयाप्रसंगी प्रमुख जिल्हा व सत्र न्या.आर.एस.तिवारी, जिल्हा न्या.-१ आर.जी.मलशेट्टी, मुख्य न्यायदंडाधिकारी अजित यादव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव डी.बी.हरणे उपस्थित होते.
याप्रसंगी न्या.आर.जी.मलशेट्टी, दिवाणी न्या.एस.टी. मलीये, सहदिवाणी न्या.व्ही.एन.मोरे, न्या.वाय.के.राऊत, ए.एस. कुलकर्णी यांनी पॅनल प्रमुख म्हणून काम पाहीले. तसेच विधीज्ञ एस.व्ही.गवळी, एस.आर.गिरनार, एम.व्ही.परदेशी, स्मिता माळी, एम.जी.परदेशी, यांनी पॅनल सदस्य म्हणून काम केले. लोक न्यायालयाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा व सत्र न्यायालय येथील प्रभारी प्रबंधक डी.पी.सैंदाणे, नंदुरबार वकील संघाचे अध्यक्ष ॲड.पी.बी.चौधरी, जे.वाय.सानप आदींनी काम पाहीले.
सदरच्या लोक न्यायालयात प्रलंबित प्रकरणांमध्ये ४७९ प्रकरणांच्या निपटाऱ्यातून ५ कोटी ४ लाख ७० हजाराची तडजोड करण्यात आली. यामदद्ये ३४ दिवाणी प्रकरणांमधून २ कोटी २५ लाख ६५ हजार ४६७ रुपये, ५२ मोटार अपघात प्रकरणांमधून २ कोटी ८ लाख ९८ हजार ४०० रुपये, ४५ चलनक्षम धनादेश प्रकरणांमधून ६६ लाख ९६ हजार ७८५ रुपये, १६ फौजदारी प्रकरणातून २३ हजार ६०० रुपये, ३२० किरकोळ फौजदारी प्रकरणांमधून २ लाख ८५ हजार ८०० रुपयांची तडजोड करण्यात आली. तर दाखलपूर्वक १४८८ प्रकरणांमधून १ कोटी २४ लाख ९८ हजार ८८ रुपयांची तडजोड करण्यात आली. यामध्ये बॅँक वसूलीच्या ९७ प्रकरणांमधून १ कोटी ९ लाख ३ हजार ४१० रुपये, वीज थकबाकी वसूलीच्या ३२ प्रकरणांमधून ८१ हजार ४३४ रुपये, पाणीपट्टी, घरपट्टी थकबाकी वसूलीच्या १ हजार ३३८ प्रकरणांमधून १४ लाख ९७ हजार ९४० रुपये तर बीएसएनएलच्या २१ प्रकरणांमधून १५ हजार ३०४ रुपयांची तडजोड करण्यात आली.








