नंदुरबार l प्रतिनिधी
दुर्गम-अतीदुर्गम भागात ७-८ वर्ष काम करूनही बदली झालेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना बदलीच्या ठिकाणी हजर होण्यासाठी उद्या कार्यमुक्त करीत असल्याने महासंघाने आंदोलन स्थगित केले असल्याचे आरोग्य कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष हर्षल मराठे यांनी सांगितले.
जिल्हा परिषद आरोग्य विभागातील आरोग्य कर्मचाऱ्यांना डोंगराळ व दुर्गम-अतिदुर्गम भागात ७ ते ८ वर्ष काम करूनही माहे मे २०२३ मध्ये बदली झालेल्या कर्मचाऱ्यांना बदली आदेशात “भरतीने उमेदवार हजर झाल्यावर कार्यमुक्त करावे” अशी जाचक व अन्यायकारक अट टाकल्याने बदल्या रखडल्या होत्या. त्यामुळे महासंघाने ३० ऑगस्ट पासून बेमुदत उपोषण व धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.
यापार्श्वभूमीवर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ रवींद्र सोनवणे यांच्याशी यशस्वी चर्चा होऊन बदली झालेल्या सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना उद्या कार्यमुक्त करणार असल्याचे सांगितले व आज रोजी प्रतिनिधिक स्वरूपात एका कर्मचाऱ्याला बदलीचे आदेश दिल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले असून आरोग्य कर्मचाऱ्यांची महत्त्वाची मागणी मंजूर झाल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी सावन कुमार व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ रवींद्र सोनवणे यांना महासंघाचे अध्यक्ष हर्षल मराठे यांनी धन्यवाद दिले. चर्चेत प्रकाश नाईक, रामदास सोनार, जितेंद्र पवार,पराग जगदेव, यशोदा वळवी, देवेंद्र राठोड, प्रकाश मराठे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
आरोग्य कर्मचाऱ्यांनी अन्यायाच्या विरोधात न्यायासाठी ठाम उभे राहिल्यास निश्चितच न्याय मिळत असल्याने कोणीही अन्याय सहन करू नये असे आवाहन महासंघाचे कार्याध्यक्ष वाय.पी.गिरी व सचिव सतीश जाधव यांनी सांगितले.