नंदुरबार l प्रतिनिधी
बनावट जन्म तारखेच्या आधारे वय वाढवत ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झालेले कात्रा (ता. धडगाव) येथील लोकनियुक्त सरपंच कपील सेगा पावरा यांना अपात्र ठरविण्यात आले. जिल्हाधिकारी खत्री यांनी तसे पत्रही जारी केले आहे.
मागील वर्षी कात्रा (ता.धडगाव) या ग्रामपंचायतीसाठी सार्वत्रिक निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीतील सरपंच पदाचे उमेदवार कपील सेगा पावरा यांनी त्यांची जन्म तारीख १३/३/२००२ अशी असतांना नामनिर्देशन पत्रात १३/३/२००० असल्याचे दाखवत खरी जन्म तारीख लपवली. सरपंच पदाच्या उमेदवारीसाठी खोटा जन्म तारखेचा दाखला सादर करीत निवडणूक लढवली.
अशा आशयाने सरपंच पदाच्या निवडणुकीतील दुसरे उमेदवार बायसिंग जामसिंग पावरा यांनी सरपंच कपील सेगा पावरा यांच्या विरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली. या तक्रारीवर अंतिम सुनावणी झाली असून जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांनी कपील सेगा पावरा यांना अपात्र घोषित केले आहे.
जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांनी अपात्र सरपंच कपिल सेगा पावरा यांच्याविरुद्ध अपात्रतेचे आदेश काढले असून तसे निवडणूक निर्णय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी व ग्रामसेवक यांना देखील कळविले आहे.








