नंदूरबार l प्रतिनिधी
सालाबादप्रमाणे खंड न पडता खान्देश कुलस्वामिनी कानुबाई-राणूबाई मातेचे आगमन धडगाव शहरात मोठ्या उत्साहात श्रावण महिन्याच्या पहिल्या रविवारी केले जाते.
धडगाव शहरात खैरनार परिवार,चव्हाण परिवार,निकम परिवार हे धडगाव शहरात अनेक वर्षापासून कानुबाई रानुबाई उत्सव साजरा करतात.
धडगाव शहरातील ग्रामस्थांचा कानुबाई रानुबाई उत्सवाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतो.रविवारी आगमनाचा दिवशी ज्या ठिकाणी कानूबाई मातेची स्थापना केलेली असते तेथे अनेक भाविक रोट घेऊन रोट पूजेसाठी असतात. कानूबाई राणू बाई मातेच्या दर्शनासाठी शहरातील भाविक महिला-मुली-पुरूष मंडळी मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात.
कानुबाई आगमनाच्या दिवशी रात्री भजनाचा कार्यक्रम घेऊन भक्ती जागर केला जातो. तसेच मिरवणुकच्या दिवशी शहरातील महिला-मुली फुगड्या खेळत ढोल ताशाचा गजरात ठेका धरत कानुबाई-रानुबाई उत्सवात शामिल होतात.
मागिल वर्षी खैरनार,भावसार,चव्हाण परिवार या तीन कुटुंबाकडे कानुबाई रानुबाई उत्सव साजरा करण्यात आला होता.
या वर्षी धडगाव शहरातील आठ कुटुंबानी कानुबाई उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला. कानुबाई रानुबाई उत्सवात धडगाव शहरात मोठया प्रमाणात गर्दी दिसून आली.धडगाव शहरात सोमवारी आठवडे बाजार असल्यामुळे कानुबाई रानुबाई मातेच्या मिरवणुकीत मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली.
या वर्षी धडगाव शहरात विजय चव्हाण,सुरेश खैरनार,नामदेव चव्हाण,खंडु सोनार,प्रेमराज निकम,जगन ढोले,राजू मोरे,मालुबाई पाटील यांचाकडे कानुबाई राणूबाई मातेची स्थापना झाली होती.
गत काळात कोरोना महामारी ने देशाला ग्रासले होते ह्या वर्षी आय फ्लू नावाचा आजार देशात घर करत असल्यामुळे भाविकांनी कानुबाईमातेकडे आय फ्लू आजारापासून देशाला मुक्ती मिळू दे अशी प्रार्थना केली.