नंदुरबार l प्रतिनिधी

वीरशैव लिंगायत समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासनातर्फे स्वतंत्र जगतज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळास मंजुरी देण्यात आली आहे. याबद्दल समाधान व्यक्त होत असून तब्बल 27 वर्षानंतर या मागणीला यश आल्याची माहिती महाराष्ट्र बसव परिषदेचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष आणि वीरशैव लिंगायत गवळी समाज संस्थेचे नदुरबार जिल्हा कार्याध्यक्ष महादू हिरणवाळे यांनी दिली.
याबाबत महादू हिरणवाळे यांनी प्रसिद्ध दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, सन 1996 पासून वीरशैव लिंगायत गवळी समाजाच्या उन्नतीसाठी स्वतंत्र जगतज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक महामंडळ स्थापन करावे अशी मागणी होती. अखेर राज्य शासनाने या प्रलंबित मागणीची पूर्तता करून घोषणा केली. या संदर्भात शासनाने आदेश देखील पारित केला आहे.
शासनाच्या या जीआर नुसार जगतज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून वीरशैव लिंगायत गवळी समाजातील बेरोजगार तरुणांना आर्थिक सहाय्य मिळणार असून उद्योग, व्यवसाय आणि स्वतःचे युनिट उभारण्यासाठी मदत होणार आहे. महात्मा बसवेश्वर महामंडळ स्थापनासाठी शिवा संघटनेतर्फेेहि राज्यभर विविध आंदोलन व धरणे करण्यात आली होती.
राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच मंजुरी दिली.
या संदर्भात लिंगायत समाजातर्फे शासनाचे आभार मानण्यात आले असून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना धन्यवाद पत्र पाठविण्यात आले आहे. महाराष्ट्र बसव परिषदेचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष महादू हिरणवाळे आणि वीरशैव लिंगायत गवळी समाज बहुउद्देशीय संस्थेचे जिल्हा सचिव अशोक यादबोले यांनी शासनाचे आभार मानले आहे. आगामी काळात महाराष्ट्र राज्यातील सर्व वीरशैव लिंगायत समाजातील युवकांना उद्योग व्यवसायासाठी चालना मिळणार असल्याने सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे.या संदर्भात घोषणेची पूर्तता होऊन नुकताच शासन आदेश निघाला याबद्दल वीरशैव लिंगायत गवळी समाजातर्फे समाधान व्यक्त होत आहे.









