नंदुरबार l प्रतिनिधी
रोटरी क्लब ऑफ नंदनगरीचे कार्यक्रम हे नेहमीच समाजापयोगी असतात, असे मत राजेंद्रकुमार गावित यांनी व्यक्त केले. ते रोटरी नंदनगरीतर्फे आयोजित विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणी शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. यावेळी मोफत आरोग्य तपासणी प्रसंगी के.डी. गावित सैनिकी विद्यालय व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय तसेच इंग्लिश मेडीयमच्या एकूण ४०० विद्यार्थ्यांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.
रोटरी क्लब ऑफ नंदनगरी, स्मित हॉस्पिटल नंदुरबार व आदिवासी देव मोगरा एज्युकेशन सोसायटी नटावद संचलित के.डी.गावित सैनिकी विद्यालय व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय पथराई यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष राजेंद्रकुमार गावित तर प्रमुख अतिथी म्हणून आदिवासी युवक क्रीडा कल्याण मंडळाचे सचिव डॉ.विभूती गावित, देवमोगरा एज्युकेशन सोसायटीच्या सचिव ऋषिका गावित, रोटरी क्लब ऑफ नंदनगरीचे अध्यक्ष फखरुद्दीन जलगुणवाला, स्मित हॉस्पिटलच्या संचालिका डॉ.तेजल चौधरी, रोटरी क्लब ऑफ नंदनगरीचे शब्बीर मेमन, राहुल पाटील, सय्यद इसरार अली, प्रवीण पाटील, अली मर्चंट आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे औचित्य साधून सैनिकी शाळेच्या आवारात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. तसेच सर्व विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजन देण्यात आले. सूत्रसंचालन के.डी.गावित सैनिकी महाविद्यालयाच्या श्रीमती रजनी करेले यांनी केले तर आभार प्राचार्य शरद पाटील यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी रोटरी क्लब आॅफ नंदनगरीचे सदस्य व के.डी.गावित सैनिकी विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांनी परिश्रम घेतले.