नंदूरबार l प्रतिनिधी
धडगाव तालुक्यातील उमराणी खु. खर्डीपाडा येथे पोलिसांनी छापा टाकून १६ लाख ५६ हजार रुपये किंमतीची विदेशी दारु जप्त करण्यात आली. तसेच भूषा गावाजवळ दारुची अवैध वाहतूक करणारे वाहन अडवून वाहनासह १० लाख १२ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. धडगाव पोलीसांनी सदरची कामगिरी केली आहे.
धडगाव तालुक्यातील उमराणी खु. खर्डीपाडा येथे येथील एका घराच्या आडोश्याला पोलिसांनी छापा टाकला असता दिलीप आपसिंग पावरा (रा. मुंगबारी), खेमजी रमशा राठोड (रा. बोरी ता. धडगाव) हे दोघे त्यांच्या कब्जात अवैधरित्या दारु साठवणूक करतांना आढळून आले. पोलिसांनी दोघांकडून १६ लाख ५६ हजार रुपये किंमतीची बनावट विदेशी दारुचे २३० बॉक्स प्रत्येक बॉक्स मध्ये ७५० मिलीच्या १२ प्लास्टीकच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या असून दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तसेच धडगाव तालुक्यातील भूषा गावाजवळील बॅक वॉटरजवळ मध्यरात्री पोलिसांनी सापळा रचून दारुची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या वाहनास पकडले. सदर वाहनात ६ लाख १२ हजार रुपये किंमतीची विदेशी दारुचे ८५ बॉक्स प्रत्येक बॉक्समध्ये १२ प्लास्टीकच्या ७५० मिली.च्या बाटल्या आढळून आल्या. याबाबत सुनिल सरदार पावरा (रा.खर्डी ता.धडगाव), अनिल गणेश भोसले व लखन सुरेश भोसले (दोघे जाहूर ता.पानसेमल जि.बडवानी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडून ६ लाख १२ हजार रुपये किंमतीची विदेशी दारु व ४ लाख रुपये किंमतीचे वाहन असा एकूण १० लाख १२ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदरची कामगिरी पोलिस अधिक्षक पी.आर.पाटील, अपर पोलिस अधिक्षक निलेश तांबे, उपविभागीय पोलिस अधिकारी दत्ता पवार, पोलिस निरीक्षक किरण खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक आय.एन.पठाण, पोलिस उपनिरीक्षक प्रविण महाले, पोहेकॉ. स्वप्निल गोसावी, शशिकांत वसईकर, विनोद पाटील, किरण पाडवी, विकास चौधरी, किरण भील, निलेश पानपाटील, महिला पोकॉ.सुनिता पाचुर्णे, चापोकॉ.राजेश तिरकाडे यांच्या पथकाने केली असून पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रविण महाले करीत आहेत.