नंदुरबार l प्रतिनिधी
पोस्टातील महिला प्रधान क्षेत्रीय बचत योजना अंतर्गत काम करणारे महिला अल्प बचत एजंट यांना अस्लास कार्डाचा तुटवडा असल्याने तो पुरवठा करण्याच्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की,पोस्टातील महिला प्रधान क्षेत्रीय बचत योजना अंतर्गत काम करणारे महिला अल्प बचत एजंट असुन गेल्या २० ते २५ वर्षा पासुन अल्प बचत एजंट म्हणून अत्यंत तुटपुंज्या मानधनावर काम करीत आहोत. आमच्या कामावर देखरेख व परवाना नुतनीकरण करणारा जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्प बचत विभाग गेल्या १० वर्षापासुन बंद करण्यात आला आह. मात्र आमचे परवाना नुतनीकरणाचे काम जिल्हाधिकारी कार्यालयातील काही महसुल अधिकारी वर्गाकडे सोपविण्यात आले आहे. परंतु खातेदारांना देण्यात येणारे अस्लास कार्ड आम्हास अल्पबचत विभाग किंवा पोस्ट ऑफीस यांचे कडुन १० वर्षा पासुन पुरविलेले नाहीत व राज्यात या अस्लास कार्डाचा तुटवडा आहे तरी देखील आजपावेतो पोस्ट कार्यालयाकडून भरणा नियमीत विनाअट स्विकारण्यात येत होता.
असे सुरळीत कामकाज सुरु असतांना अचानक कुठलीही पुर्वसुचना न देता व अस्लास कार्डाचा पुरवठा न करता टपाल खात्याच्या वेबपोर्टलवर अस्लास कार्ड नंबर नमुद केल्याशिवाय भरणा स्विकारला जाणार नसल्याचे कळविले आहे. मात्र हे अस्लास कार्ड अल्पबचत विभाग किंवा पोस्ट ऑफीस यांचे कडेच उपलब्ध नाहीत तेंव्हा कार्ड नंबर टाकणार कसा हा प्रश्न उभा राहीला आहे.त्यामुळे पोस्टात भरणा बंद असल्याने सरकारकडे अल्पबचत प्रतिनिधींच्या माध्यमातून जमा होणारा निधी जमा होउ शकलेला नाही व आमचे उपजिवीकेचे साधन असलेले कमीशन आम्हास मिळु शकले नाही.
त्याचप्रमाणे सदर कलेक्शन केलेली रक्कम न भरणा झाल्यास आम्हास २ टक्के दंडाचा आर्थिक भुर्दंड सोसावा लागेल. आम्ही शासनाचे सर्व नियम पाळण्यास तयार आहोतच तरी संबंधीत यंत्रणेने अस्लास कार्ड मुबलक प्रमाणात ग्रामीण भागातील शेवटच्या प्रतिनिधीपर्यंत मिळण्याची व्यवस्था केल्यानंतरच वेबपोर्टलवर अस्लास कार्ड क्रमांक टाकण्याची अट टाकावी तो पर्यंत पुर्वीप्रमाणेच विना अस्लास कार्ड नंबर शिवाय महिला एजंट यांच्याकडुन भरणा स्विकारण्याबाबत आपल्या स्तरावरुन संबंधीत यंत्रणेकडे पाठपुरावा करावा अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
सदर निवेदन सर्व अल्पबचत महिला एजंट मार्फत निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांना देण्यात आले यावेळी हितेश शहा, संजय बागुल, उज्वला बागुल, सौ. कुलकर्णी, मीनाक्षी माळी, कल्पना जोशी, अशोक जोशी, मोहन सोनवणे उपस्थित होते.








