नंदुरबार l प्रतिनिधी
प्रत्येक क्षेत्रात यश प्राप्तीसाठी प्रारंभी नियोजन महत्त्वाचे ठरते.जगाच्या पाठीवर नियोजन केल्यास कुठलीही गोष्ट अशक्य नाही.संधीचे सोनं करणे आपल्याच हाती आहे.अवघ्या पन्नास वर्षाच्या आयुष्यात स्वराज्याचे तोरण बांधणाऱ्या छत्रपती शिवरायांसारखे नियोजन केल्यास प्रत्येक युवक यशाचा मानकरी होईल.असे भावपूर्ण उद्गार प्रसिद्ध प्रबोधनकार इतिहासाचे गाडे अभ्यासक महाराष्ट्राची मुलुख मैदानी तोफ पुणे येथील प्रा. नितीन बानगुडे पाटील यांनी केले.
नंदुरबार येथील भामरे अकॅडमीतर्फे भामरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रांतर्गत विविध क्षेत्रात प्राविण्य मिळविलेल्या गुणवंतांचा गुण गौरव समारंभ समारंभ नुकताच झाला. येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिराच्या सभागृहात तुडुंब गर्दीत झालेल्या या सोहळ्याला प्रमुख व्याख्याते म्हणून उपस्थित प्रा. नितीन बानगुडे पाटील यांच्या प्रबोधनाने विद्यार्थी व पालकांना प्रभावित केले.
यावेळी पुढे बोलताना बानगुडे पाटील म्हणाले की,स्वातंत्र्यापूर्वी 1942 च्या आंदोलनात नंदनगरीच्या बालवीर शहिद शिरीषकुमार मेहता आणि सवंगड्यांनी दिलेल्या बलिदानामुळे नंदुरबारचे नाव हिंदुस्थानातअजरामर झाले.कोवळ्या शालेय बालकांनी ब्रिटिशांशी लढा देऊन इतिहास घडविला. नंदुरबार जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी यशो शिखरावर जात आहेत. विशेष म्हणजे भामरे अकॅडमीचे संचालक प्रा. युवराज भामरे यांच्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना यश प्राप्ती होत असल्याने समाधान वाटते. स्वतःचा राज्याभिषेक न करता स्वतः कायम युवराज राहणे पसंत करणारे प्रा. भामरे यांनी अनेकांना यशाच्या सिंहासनावर बसविले.
यासाठी प्रत्येकाने जिद्द चिकाटी आणि सातत्य अंगीकारणे महत्त्वाचे आहे.वेळच मिळाला नाही आणि परिस्थितीचा बाऊ न करता मी यशस्वी होईलच ही महत्त्वाकांक्षा बाळगणे गरजेचे आहे.गरीबी आणि श्रीमंती याच्यातील दरी दूर करून यश मिळविता येते.नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा व परिसरातील झोपडीत राहणाऱ्या आदिवासी युवकांनी देखील पोलीस विभाग आणि इतर क्षेत्रात प्राविण्य मिळविले आहे. भविष्यकाळात दुर्गम भागातील गरीब शेतकऱ्याचा मुलगा देखील उच्च पदस्थ अधिकारी होतील यात शंकाच नाही.असे प्रतिपादन प्रा. नितीन बानगुडे पाटील यांनी केले.ऐतिहासिक घटनांसह भूतकाळ आणि वर्तमान काळातील विविध घटनांचे दाखले देत सलग दोन तास प्रा. नितीन बानगुडे पाटील यांनी विदयायार्थ्यांना खिळवून ठेवले.

टाळ्यांच्या गजरात विद्यार्थ्यांनी व्याख्यानाला प्रतिसाद दिला.
छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहातील सभागृह फुल्ल झाल्यामुळे शेजारील डोममध्ये भव्य स्क्रीन लावून हजारो विद्यार्थ्यांनी या सोहळ्याचा लाभ घेतला. प्रारंभी सरस्वती पुजनासह प्रा. नितीन बानगुडे पाटील यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून शहर पोलीस निरीक्षक रवींद्रर कळमकर, कर सहाय्यक किशोर निकम, उद्योजक विलास पाटील, अंबालाल गिरासे, योगेश गिरासे, पोलीस उपनिरीक्षक एस. के. आहेर, बळीराम भामरे, देविदास पवार, शरद कारभारी पवार, आणि संयोजक प्रा. युवराज भामरे उपस्थित होते.
या गुणगौरव सोहळ्यात भामरे अकॅडमी तर्फे नंदुरबार जिल्ह्यातून पोलीस विभागासह विविध क्षेत्रात निवड झालेल्या 75 विद्यार्थ्यांचा पालकांसह गौरव करण्यात आला. प्रेरणादायी वक्ते आणि लेखक प्रा. नितीन बानगुडे पाटील यांच्या व्याख्यानाने असंख्य विद्यार्थी आणि पालक भारावून गेले.